पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामध्ये दिनांक १ जानेवारी ते ५ जानेवारी २०२६ या कालावधीत “रेव्हिट सॉफ्टवेअर” या विषयावर फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे यशस्वी आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
हा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम एक्स्पर्ट कॅड सेंटर, पुणे यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी श्री. अभिषेक खांबे (चेअरमन, एक्स्पर्ट कॅड सेंटर) हे प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते. त्यांनी बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग (BIM) संकल्पना, रेव्हिट सॉफ्टवेअरद्वारे आर्किटेक्चरल व स्ट्रक्चरल मॉडेलिंग, २ डी ते ३ डी रूपांतरण, ड्रॉइंग जनरेशन, क्वांटिटी टेक-ऑफ तसेच उद्योगामधील रेव्हिट सॉफ्टवेअरचा प्रत्यक्ष वापर याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या हस्ते श्री. अभिषेक खांबे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी अशा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राममुळे अध्यापनाची गुणवत्ता वाढते, प्राध्यापकांचे तांत्रिक कौशल्य अद्ययावत राहते तसेच विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख शिक्षण देणे शक्य होते, असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, प्रशिक्षणात्मक व उद्योगाभिमुख उपक्रमांची माहिती दिली. भविष्यातही अशा नाविन्यपूर्ण व कौशल्यवर्धक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चेतन पिसे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांनी संशोधन, नवोन्मेष आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालणाऱ्या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राममुळे सहभागी प्राध्यापकांचे रेव्हिटसारख्या आधुनिक BIM टूलविषयीचे तांत्रिक ज्ञान अधिक दृढ झाले असून, वेळ, खर्च व गुणवत्ता नियंत्रणासह अचूक प्रकल्प नियोजन आणि डिझाइनमधील अचूकता साध्य करणे सुलभ होणार आहे. परिणामी, अध्यापन प्रक्रियेत नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर वाढून विद्यार्थ्यांना अधिक व्यावसायिक, प्रभावी व रोजगाराभिमुख शिक्षण मिळणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. यशवंत पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत व प्रतिष्ठेत निश्चितच भर पडली आहे.
या कार्यक्रमात विभागातील सर्व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रम समन्वयक प्रा. मिलिंद तोंडसे तसेच विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

