पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी एस. के. एन . सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय पंढरपूर येथे अँन्टी रँगीग सेल वतीने तसेच राष्ट्रीय नालसा डॉन योजनेअंतर्गत ( ड्रग अवेअरनेस आणि वेलनेस नेव्हीगेशन-ड्रग-फ्री इंडिया योजना-२०२५) राष्ट्रीय युवा दिन व स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून तृतीय वर्ष संगणक, इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रोनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरींग विभागातील विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक जनजागृती शिबिराचे सशक्त व प्रभावी आयोजन करण्यात आले. हा उपक्रम महाराष्ट्र राज्यविधी सेवा प्राधीकरण व प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधीकरण अध्यक्ष एम. एस.शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा विधी सेवा प्राधीकरण सचिव पी.पी.पेठकर यांच्या सहकार्याने तालुका विधी सेवा समिती व पंढरपूर अधीवक्ता संघ पंढरपूर यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आला.
या उपक्रमाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांमध्ये UGC Anti-Ragging Regulations-2009, भारतीय दंड संहिता (IPC), माहिती तंत्रज्ञान अधिनियम-2000 अंतर्गत सायबर गुन्हे, तसेच भारतीय संविधानाने प्रदान केलेले विद्यार्थी हक्क व कर्तव्ये यांविषयी सखोल, शास्त्रशुद्ध व व्यवहार्य जाणीव निर्माण करणे हा होता. पंढरपूर अधिवक्ता संघातील मान्यवर कायदेतज्ज्ञांनी विविध प्रत्यक्ष घटनांची उदाहरणे मांडत कायद्याचे गांभीर्य, कायद्याच्या उल्लंघनाचे गंभीर परिणाम, तसेच व्यक्ती व समाजावरील त्याचे दूरगामी परिणाम अत्यंत प्रभावी व समर्पक पद्धतीने उलगडून सांगितले. कायद्याचे पालन हे केवळ वैयक्तिक सुरक्षिततेसाठी नव्हे तर सामाजिक सुव्यवस्थेसाठी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्रीमती एम. बी. कुलकर्णी, द्वितीय सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर), पंढरपूर या विराजमान होत्या. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी कायदा हा दंडात्मक साधन नसून समाजातील शिस्त, समता व न्याय टिकवून ठेवणारा मजबूत आधारस्तंभ आहे, असे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी कायद्याची योग्य जाण ठेवून शिस्त, नैतिक मूल्ये, सामाजिक बांधिलकी व नागरिकत्वाची जाणीव अंगीकारत आपले व्यक्तिमत्त्व घडवावे, तसेच देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी जबाबदार व सजग नागरिक म्हणून योगदान द्यावे, असे प्रेरणादायी आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्त सहभाग नोंदवित विविध कायदेविषयक प्रश्न उपस्थित केले व तज्ज्ञांकडून समर्पक मार्गदर्शन प्राप्त केले. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायदेशीर साक्षरता, सामाजिक भान व नागरिकत्वाची जाणीव अधिक दृढ झाली. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने करण्यात आली
अशा प्रकारचे जनजागृती उपक्रम विद्यार्थ्यांना कायद्याचे भान देऊन स्वामी विवेकानंदांच्या विचारांप्रमाणे सशक्त, जबाबदार व जागरूक युवा घडविण्यास निश्चितच पूरक ठरतात, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

