पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
माघ शुद्ध एकादशी 29 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. यात्रा कालावधी 23 जानेवारी ते 01 फेब्रुवारी असून, श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात तीन ते चार लाख भाविक येतात. या यात्रा कालावधीत अहिल्या पुलावरुन वारकरी भाविकांच्या व इतर वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतुक होत असते. अहिल्या पुलावरील संरक्षक कठडे नादुरुस्त असून, या ठिकाणी कोणतीही अनुचित घडना घडू नये यासाठी तात्काळ मजबूत संरक्षक कठडे करावेत तसेच प्रखर प्रकाश व्यवस्था करावी अशा सूचना प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या.
माघवारी पूर्व नियोजनाबाबत प्रांत कार्यालय पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उप कार्यकारी अभियंता भीमाशंकर मेटकरी, मुख्याधिकारी महेश रोकडे, पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे, मंदिर समितीचे लेखाधिकारी मुकेश आनेचा, यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते .
यावेळी प्रांताधिकारी श्री इथापे म्हणाले, यात्रा कालावधीत चंद्रभागा नदीपात्रात वारकरी भाविकांना पवित्र स्नान करता यावे यासाठी पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याचे नियोजन करावे. या कालावधीत नगरपालिकेने स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा मुबलक पाणी पुरवठा करावा, वाळवंटाचीस्वच्छता व पुरेशा प्रकाश राहिल याबाबत नियोजन करावे तसेच अतिक्रमणे काढावीत, बोअरवेल व हातपंप पाण्याची तपासणी करावी. मंदीर समितीने व नगरपालिकेने प्रदक्षिणा मार्ग, नदीपात्रात आवश्यक ठिकाणी बॅरकेंटींग करावे व अग्निशामक यंत्रणा कार्यरत ठेवावी . नदी पात्रात वाहने येऊ नयेत यासाठी बॅरेकेटींग करावे. सुलभ शौचालयाचा ठिकाणी मुबलक पाणी व्यवस्था करावी. वाहनतळाची जादा व्यवस्था करावी. तसेच मोफत वाहनतळ व्यवस्थेबाबत ठळक फलक लावावेत. अन्न औषध प्रशासन विभागाने मठात शिजविण्यात येणाऱ्या अन्नाची तसेच शहरातील हॉटेलची वेळोवेळी तपासणी करावी. शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने नियोजन करावे. अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
मंदीर समितीने यात्रा कालावधीत भाविकांना दर्शन रांग, दर्शन मंडप येथे आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असून, दर्शनरांगेत मॅट, बसण्याची सुविधा, पिण्याचे पाणी, शौचालये, विश्रांती कक्ष, बाथरूम, लाईव्ह दर्शन आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.दर्शनरांगेत भाविकांना मोफत चहा व खिचडी वाटप करण्यात येणार आहे. चेंजिंग रूम, हिरकणी कक्ष, दर्शनमंडप येथे महिला भाविकांच्या सोईसाठी सॅनिटरी नॅपकीन, चंद्रभागा वाळवंट येथे चेंजिंग रूम उभारण्यात येत आहे. तसेच भाविकांच्या सुलभ व जलद दर्शनाला प्राधान्य दिले असून, यासाठी योग्य नियोजन करण्यात आले असल्याची माहिती मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी यावेळी दिली.

