सातारा प्रतिनिधी तेज न्यूज
दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त नायगाव जिल्हा सातारा येथील जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये नामदार छगन भुजबळ मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य यांचे नाव जाणीवपूर्वक सर्वात शेवटी सन्माननीय मंत्री,सन्माननीय खासदार, आणि सन्माननीय आमदारांच्या खाली टाकण्यात आले आहे.
वास्तविक छगन भुजबळ हे राज्यातील सर्वात जेष्ठ मंत्री आणि या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आहे.मात्र जिल्हा परिषद प्रशासन सातारा यांनी पत्रिकेत त्यांचे नाव सर्वात शेवटी आणि विधानसभा सदस्य म्हणून टाकले आहे.राजशिष्टाचारानुसार सन्माननीय मुख्यमंत्री आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री यांच्या नंतर भुजबळ यांच्या नावाचा प्रोटोकॉल आहे.त्यामुळे जाणीवपूर्वक राज्याचे मंत्री आणि पर्यायाने शासनाचा अवमान करण्यात आला आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मस्थळ असलेल्या नायगाव येथील निवासस्थानाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा आणि या स्थळाचा विकास छगन भुजबळ यांनी केलेला आहे. मात्र जाणून बुजून त्यांचे नाव पत्रिकेत शेवटी टाकण्यात आले आहे.हा विधिमंडळ आणि शासनाचा अवमान आणि हक्कभंग आहे.
या गंभीर प्रकरणी या कार्यक्रमाचे आयोजक असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांच्यावर कठोर शासकीय कारवाई करण्यात यावी.शासनाचा अवमान आणि हक्कभंग प्रकरणी आम्ही सातारा जिल्हा परिषद प्रशासनाचा निषेध करत आहोत.
वरील प्रकरणात राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी लक्ष देऊन पत्रिकेत दुरूस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थान कडून केली जात आहे.

