पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
रयत शिक्षण संस्थेच्या पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात प्रसिद्धी व फोटो समिती, राष्ट्रीय सेवा योजना समिती व इंटायर मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी पत्रकार दिन समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास दै. पंढरी भूषणचे संपादक शिवाजी शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव होते.
यावेळी मंचावर वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य तथा अधिष्ठाता डॉ. सुशीलकुमार शिंदे, अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे प्रमुख समन्वयक डॉ. अमर कांबळे, कला विभागाचे अधिष्ठाता डॉ. समाधान माने, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी डॉ. दत्तात्रय चौधरी, दै. पुण्यनगरीचे सतीश बागल आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसिद्धी व फोटो समितीचे प्रमुख डॉ. दत्तात्रय डांगे यांनी केले, तर प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांचा परिचय प्रा. बालाजी फुगारे यांनी करून दिला.
“पत्रकारिता: काल, आज आणि उद्या” या विषयावर मार्गदर्शन करताना शिवाजी शिंदे म्हणाले की, “भारतासारख्या लोकशाही देशाला पत्रकारितेची उज्ज्वल परंपरा लाभलेली आहे. स्वातंत्र्यलढ्यापासून ते विविध सामाजिक चळवळींपर्यंत पत्रकारितेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राजकीय दबाव, आव्हाने असूनही पत्रकारितेने कधीही सत्याशी तडजोड केली नाही. आज सोशल मीडियाच्या काळात बातम्यांमधून नेरिटिव्ह तयार करून समाजमन घडवले जात आहे, ही बाब धोकादायक असून पत्रकारांनी याला बळी न पडता बातमीमागील सत्य समाजासमोर आणणे आवश्यक आहे. बदलत्या सामाजिक, आर्थिक व तांत्रिक परिस्थितीत विश्लेषणात्मक पत्रकारितेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे”.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव म्हणाले की, ‘मराठी पत्रकारितेला मोठा आणि गौरवशाली इतिहास आहे. पत्रकारिता ही संभ्रम निर्माण करणारी नसून समाजाला अचूक, वस्तुनिष्ठ आणि पुरेशी माहिती देणारी असावी. पत्रकारांच्या लेखणीचा समाजमनावर मोठा प्रभाव असतो, त्यामुळे बातमीत प्रामाणिकपणा व वास्तवता असली पाहिजे. शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक यांच्या समस्या मांडून त्यांना योग्य दिशा देण्याचे काम पत्रकारांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमात विविध वर्तमानपत्रांचे संपादक, सहसंपादक, निवासी संपादक, उपसंपादक, वार्ताहर तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे संपादक, कॅमेरामन, निवेदक यांचा मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प, पेन व डायरी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार प्रशांत वाघमारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी चाळीसहून अधिक वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील सीनियर विभागातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल डॉ. विनया पाटील, प्रा. राजेंद्र मोरे, प्रा. संदीप बागल, प्रा. नितीन कांबळे, प्रा. दत्तात्रय खिलारे, अभिजित जाधव, अमोल माने, समाधान बोंगे व ओंकार नेहतराव यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाची सुरुवात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन करून झाली. सूत्रसंचालन प्रा. मोहिनी सावंत यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. धनंजय वाघदरे यांनी केले.

