पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद 8 गट व पंचायत समितीच्या 16 गणाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचार संहिता अंमलबजावणी व निवडणुका पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार सचिन लंगुटे यांनी दिली.
पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक -2026 चा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्याअनुषंगाने जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. पंढरपूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद गट एकूण 08, पंचायत समिती गण एकूण -16 आहेत.
पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद गट वाखरी, करकंब, भोसे, गोपाळपूर, टाकळी, कासेगाव, रोपळे, भाळवणी हे 8 जि.प. गट आहेत. तर पंचायत समिती गण उंबरे, करकंब, भोसे, गुरसाळे, रोपळे, सुस्ते, पुळूज, गोपाळपूर, वाखरी, पटवर्धन कुरोली, भाळवणी, पळशी, टाकळी, खर्डी, कासेगाव, सरकोली हे 16 गण आहेत. यासाठी 309 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.
नामनिर्देशन अर्ज, त्यासोबत जोडावयाचे प्रपत्रे, छाननी, उमेदवार माघार, निवडणुक चिन्ह वाटप, मतदान दिवशी घ्यावयाची खबरदारी, अनामत रक्कम, मतमोजणी आदर्श आचार संहितेचे पालन करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत.
8 जिल्हा परिषद गटासाठी 8 कर्मचारी तर 16 पंचायत समिती गणासाठी 16 कर्मचारी फॉर्म तपासणीसाठी नियुक्त करण्यांत आले आहेत. तसेच आचारसंहिता कक्ष तयार करण्यात आला असून यामध्ये गटविकास अधिकारी त्यांचे नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. हे आचार संहिता कक्ष पंचायत समिती, शेतकी भवन येथे असणार आहे. या कक्षात एक खिडकी कक्ष असणार असून येथे प्रचार संबधित सर्व परवानग्या दिल्या जाणार आहेत. तसेच एफएसटी, एसएसटी, व्हिएसटी पथकाव्दारे आचारसंहिता नियंत्रण केले जाणार असल्याचे सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार सचिन लंगुटे यांनी सांगीतले.
निवडणूक कार्यक्रमाची सुचना प्रसिध्द करण्याचा दि.16 जानेवारी, नामनिर्देशन पत्र भरण्याचा कालावधी दि. 16 ते 21, नामनिर्देशनपत्र छाणनी दि.22 रोजी तर याच दिवशी यादी प्रसिध्द होणार, दि. 23 ते 27 उमेदवारी अर्ज माघार, दि. 27 रोजी अंतिम उमेदवारांची यादी व चिन्ह वाटप, मतदान दि. 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते 5.30 वा. पर्यंत, मतमोजणी दि. 7 रोजी करण्यात येणार आहे.

