सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्याचे वजनकाटे तपासणीकरिता भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकामध्ये वैधमापन शास्त्र विभाग, महसूल विभाग, पोलीस विभाग व प्रादेशिक सहसंचालक (साखर) व साखर कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी प्रतिनिधींचा समावेश असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
भरारी पथकातील सदस्यांची नांवे व पदनाम पुढीलप्रमाणे,
• भरारी पथक प्रमुख हे संबंधित सर्व तालुक्यातील तहसिलदार असतील,
• सदस्य सचिव हे सर्व तालुक्यातील उपनियंत्रक, वैध मापनशास्त्र विभागातील असतील,
• सदस्य हे ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत साखर कारखाना असेल त्या पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार
असतील,
• पंढरपूर, सांगोला तालुक्यातील सदस्य श्री.ए.एन.बचुटे, लेखापरीक्षक श्रेणी-१ अधिन विशेष लेखापरीक्षक वर्ग-१, सह. सहकारी संस्था (साखर).
• माळशिरस, माढा तालुक्यातील सदस्य श्री.ए.एस. म्याकलवार, उपलेखापरीक्षक अधिन विशेष लेखापरीक्षक वर्ग-१, सहकारी संस्था (साखर).
• बार्शी, करमाळा तालुक्यातील सदस्य श्री.एन.बी. ठोकळ, लेखापरीक्षक श्रेणी-१ अधिन द्वितीय विशेष लेखापरीक्षक वर्ग-१, सहकारी संस्था (साखर).
• मोहोळ, मंगळवेढा तालुक्यातील सदस्य श्री. मोरे, लेखापरीक्षक श्रेणी-२ अधिन द्वितीय विशेष लेखापरीक्षक वर्ग-१, सहकारी संस्था (साखर).
• उ. सोलापूर, द. सोलापूर तालुक्यातील सदस्य हे श्री.एस.आर.आडम, लेखापरीक्षक श्रेणी-१ अधिन तृतीय विशेष लेखापरीक्षक वर्ग-१, सहकारी संस्था (साखर).
• अक्कलकोट तालुक्यातील सदस्य हे श्री.डी. के. मुदाळे, लेखापरीक्षक श्रेणी-२ अधिन तृतीय लेखापरीक्षक वर्ग-१, सहकारी संस्था (साखर) सोलापूर.
• सदस्य शेतकरी प्रतिनिधी, यांची नियुक्ती तहसिलदार यांनी करावी.
सदर भरारी पथकांची कार्यप्रणाली खालीलप्रमाणे राहील.
• भरारी पथकातील सदस्यांची नांचे व संपर्क क्रमांक कार्यक्षेत्रातील साखर कारखाने व शेतकरी यांना उपलब्ध होतील अशा प्रकारे प्रसिद्ध करण्यात यावीत.
• जिल्हयातील भरारी पथकांनी स्वयंस्फुर्तीने कारखानास्थळावर अचानक भेटी देऊन वजनकाट्यांची तपासणी करावी. जेणेकरुन ऊसाचे वजना संदर्भात प्राप्त होणाऱ्या तक्रारीवर आळा बसेल.
• शेतकऱ्यांना वजनाची पावती योग्य प्रकारे देण्यात येते किंवा कसे याची खात्री करणे.
• एखादया साखर कारखान्याच्या बाबतीत ऊसाचे वजनाबाबत गैरप्रकार होत असल्याची तक्रार यंत्रणेस किंवा पोलीसांकडे प्राप्त झाल्यावर लगेच त्या साखर कारखान्याचे वजनकाट्याची तपासणी करावी आणि गैरप्रकार आढळल्यास यंत्रणेमार्फत योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.
• वजनकाट्याच्या तपासणीमध्ये काही गैर कायदेशीर बाबी आढळल्यास सर्व संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी.
ऊस वजन काटा कॅलिब्रेशन मध्ये फेरफार करुन ऊस वजन काटामारी केली जाते अशा तक्रारी प्राप्त होत आहे. यासाठी ऊस वजनकाटा कॅलिब्रेशन करुन सील करणे आवश्यक आहे. संबंधित वैधमापन अधिकाऱ्याने वजनकाट्याची तपासणी करतेवेळी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन ऊस वजन काटे कॅलिब्रेशन झालेनंतर सील करावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.
साखर कारखान्यांच्या वजनकाटे तपासणी संदर्भात भरारी पथकांमध्ये सुयोग्य अशा शेतकरी प्रतिनिधीचा समावेश तहसिलदार यांनी करावा. तहसिलदार यांनी भरारी पथकातील सदस्यांचे नांव व संपर्क क्रमांक सदर कार्यक्षेत्रातील साखर कारखाना व शेतकरी यांना उपलब्ध होईल अशा प्रकारे प्रसिद्ध करावेत. तसेच तालुकानिहाय पथकाचे नांव व संपर्क क्रमांक या कार्यालयास अवगत करावेत.
भरारी पथकांनी केलेल्या कार्यवाहीबाबत दर पंधरवड्यास अहवाल सादर करावा. सदरचा आदेश हा सोलापूर जिल्ह्याचे हद्दीत लागू राहील, असे पत्रकात नमूद आहे.

