प्रस्थापितांचे राजकारण… विस्थापितांना धडा...
आज भारतीय राजकारण एका अशा वळणावर आले आहे की लोकशाहीची खरी शक्ती असलेला जनमत हा केवळ मतदानाचा दिवस बाकी राहिलेला सोहळा होऊन बसला आहे. सत्तेचे राजकारण इतके स्वार्थी झाले आहे की प्रस्थापित नेत्यांना फक्त खुर्ची हवी आणि ती मिळवण्यासाठी चेहेरे बदलण्यास, पाट्या बदलण्यास किंवा विचारहीन जोडगोळी करायला क्षणभरही मागेपुढे पाहावे लागत नाही.
ज्यांना जनता पाच वर्षांपूर्वी आरशात पाहत होती तेच चेहरे आज दुसऱ्या पक्षाच्या ध्वजाखाली उभे दिसतात आणि जनता पुन्हा त्याच भाषणांना टाळ्या देते, हीच या विस्थापित लोकशाहीची शोकांतिका आहे. प्रस्थापितांचे डावपेच इतके शांत आणि उच्च दर्जाचे असतात की ते उद्याची सत्ता नव्हे तर पुढील चार-पाच पिढ्यांचा राजकीय जम बसवतात. तर विस्थापित समाज अजूनही आजच्या वादात, भावनात, जात - धर्म - भाषा - प्रदेशाच्या जाळ्यात अडकलेला असतो.
शिक्षण ही खरी सत्ता आहे हे प्रस्थापितांनी अगोदरच ओळखले म्हणूनच शिक्षणव्यवस्था कुरूप केली जाते, खाजगीकरणाची लाट चढते, सरकारी शाळा मागे पडतात आणि शैक्षणिक संधींचे अंतर इतके वाढते की गरीब समाजातला मुलगा अभ्यासापेक्षा स्पर्धा आणि उपजिविकेच्या संघर्षातच आयुष्य हरवतो. तेव्हा हा समाज स्वतःच स्वतःच्या भविष्यापासून विस्थापित होतो. जातीत अडकलेल्या लोकांना कामाच्या, रोजगाराच्या, उद्योगाच्या, कौशल्याच्या, आणि वैज्ञानिक विचारांच्या प्रश्नांना स्पर्श करण्याची ताकद नसते...
मग प्रस्थापितांना त्यांच्यावर राज्य करणे अधिक सोपे होते. शिक्षणाचा वारसा नसेल तर सत्ता बदलली तरी जीवन बदलत नाही, कारण राजकारणात चेहरे बदलतात, नावं बदलतात पण जनतेचे वास्तव आणि ग्रामीण तरुणांचे भविष्य मात्र बदलत नाही. जर विस्थापितांनी शिक्षण, विचार आणि विज्ञानाला केंद्रस्थानी ठेवून संघटित होण्यास सुरुवात केली, तर प्रस्थापितांच्या राजकारणाला खरी टक्कर देता येईल. कारण खरे विस्थापित ते नाहीत जे घर सोडतात, तर ते आहेत जे विचार सोडतात.
आज आपण जातीत, धर्मात, भाषेत व प्रदेशात विभागले गेलो, म्हणून प्रस्थापितांच्या हातात सत्ता गेली. उद्या आपण शिक्षणात, विचारात आणि प्रश्नांमध्ये संघटित झालो तर हीच सत्ता आपण परत घेऊ शकतो. कारण सत्ता तीच टिकते जी प्रश्न विचारणाऱ्यांच्या हातात असते, भावनिक होणाऱ्यांच्या हातात नाही.
प्रा.आनंदा आलदर 🖋️


