मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
शिक्षणावरील व शिक्षकांवरील अन्याय कमी होण्याऐवजी वेगवेगळ्या जाचक निर्णयांतून दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. लहान लहान गावे, तांडे, वाड्या-वस्त्या,जिथे अजूनही मातृभाषेतून ज्ञानाचा दीपक तेवत आहे,तेच दिवे आता विझवण्याची जणू व्यवस्थेकडून तयारी सुरू आहे.
नव्या संचमान्यता धोरणांमुळे हजारो अनुदानित, अंशतः अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांना कायमस्वरूपी सरकारी शिक्षकाविना चालवण्याचा अन् शिक्षकांची हजारो पदे अतिरिक्त ठरवण्याचा धोकादायक खेळ सुरू आहे. या खेळात सर्वात मोठे बळी ठरत आहेत ते म्हणजे आपल्या मुलांचे भविष्य आणि मातृभाषेतील शिक्षणाचा अधिकार. गरीब, वंचित, आदिवासी, अल्पसंख्यांक कुटुंबांच्या डोळ्यातलं स्वप्न असलेल्या अनुदानित सरकारी शाळाच बंद पडण्याच्या उंबरठ्यावर आहेत, आणि त्यामुळे भविष्यात त्यांच्या हातात परदेशी भाषेच्या महागड्या शिक्षणाशिवाय पर्याय उरणार नाही.
एकीकडे शाळा आणि शिक्षक कमी करण्याचा हा घातक डाव; तर दुसरीकडे शिक्षकांना खऱ्या अध्यापनापासून दूर नेणारी अनावश्यक ऑनलाईन कामांची, अहवालांची, कार्यक्रमांच्या ओझ्याची अखंड साखळी. वर्गातून मुलांच्या डोळ्यांत बघण्याऐवजी शिक्षकांना स्क्रीनसमोर बसवले जात आहे, आणि शिक्षक- विद्यार्थी अशी गाठभेट होऊच नये यासाठी शिक्षणाच्या मुळाशीच घाव घातला जात आहे.
टीईटीच्या चर्चेमुळे अनेक अनुभवी शिक्षकांच्या मानगुटीवर असुरक्षिततेची तलवार टांगली गेली आहे, ज्यामुळे शिक्षक वर्गामध्ये प्रचंड ताण आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे.त्यामुळे टीईटी परीक्षेची सक्ती न करता राज्य शासनाने केंद्र सरकारकडे २०१७ च्या कायद्यात योग्य तो बदल करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी तमाम शिक्षक वर्गाची अपेक्षा आहे.
आधार प्रमाणित संचमान्यतेमुळे शाळांत पटसंख्या असूनही फक्त आधार कार्ड उपलब्ध नसणे अथवा ते प्रमाणित न होऊ शकणे या एका कारणामुळे हजारो शिक्षकांची पदे अतिरिक्त ठरत आहेत. आज प्रश्न फक्त अतिरिक्त शिक्षकांच्या नोकरीचा नाही; प्रश्न आहे...आपल्या शाळांचे, आपल्या मातृभाषेचे, आणि सर्वसामान्य मुलांच्या शिक्षणाच्या हक्काचे. जर आपण शांत राहिलो, तर प्रत्येक वर्षी आपल्या आसपास कित्येक मराठी, हिंदी, उर्दू किंवा इतर मातृभाषेतील शाळा नाहीशा होतील, आणि इंग्रजी माध्यमाच्या महागड्या शाळा मनमानी सुरू करतील.
उद्या इतिहास लिहिला जाईल, तेव्हा जर मला प्रश्न विचारला गेला, जेव्हा शाळांवर काळे ढग दाटून आले होते, तेव्हा कुठे होते? तेंव्हा मला अभिमानाने सांगता येईल की मी शिक्षकांसोबत,पालकांसोबत शिक्षण हक्काच्या चळवळीत सक्रिय सहभागी होतो.
म्हणूनच सर्वच शिक्षक संघटनांनी दिलेल्या हाकेला आता ठाम प्रतिसाद देण्याची वेळ आली आहे. जरी मी व माझा पक्ष सरकारमध्ये असला, तरीही नेहमीच अन्यायाविरोधात वाचा फोडण्याचे संस्कार मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेले असल्याने ५ डिसेंबर २०२५ रोजी पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनात मी सक्रिय सहभागी होणार असून सर्व शिक्षकांनी शाळांचे कामकाज बंद ठेऊन, प्रत्येक जिल्ह्या-जिल्ह्यात आयोजित आंदोलनात शांततापूर्ण पण निर्णायक पद्धतीने आपण शासनासमोर सांगूया की – टीईटीच्या नावाखाली शिक्षकांच्या मानमरातबाशी खेळ मान्य नाही, आम्हाला संचमान्यतेचे अन्यायकारक निकष मान्य नाहीत, आणि अशैक्षणिक ओझ्याखाली शिक्षण गुदमरू देणार नाही.
- हा दिवस रागाचा नाही, पण स्वाभिमानाचा असेल.
- हा दिवस अराजकतेचा नाही, पण संघटित आणि शिस्तबद्ध विरोधाचा असेल.
- हा दिवस पगाराच्या चिंतेसाठी नव्हे, तर मुलांच्या भविष्यासाठी आणि मातृभाषेच्या अस्तित्वासाठी असेल.
हीच आज सर्वांसाठी ऐतिहासिक जबाबदारी आहे. शिक्षण वाचवण्यासाठी एक दिवस उभे राहू या; जेणेकरून उद्या पुढच्या पिढीसमोर अभिमानाने सांगता येईल – “हो, त्या शिक्षण हक्काच्या लढ्यात मीही खांद्याला खांदा लावून उभा होतो.”
मंगेश चिवटे,
विशेष कार्य अधिकारी, उपमुख्यमंत्री कार्यालय ,कक्षप्रमुख -उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष


