पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागाच्या वतीने संस्थेचा ‘नवोन्मेष दिन’(इनोव्हेशन डे) आणि ‘आयट्रीपल ई डे’ हे दोन्ही उपक्रम बुधवार, दि.१५ ऑक्टोबर २०२५ रोजी संयुक्तपणे साजरे करण्यात आले.
भारताचे माजी राष्ट्रपती आणि ‘भारताचे क्षेपणास्त्र पुरुष’ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम’ यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांमध्ये ‘नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि उद्योजकते’विषयी प्रेरणा निर्माण करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून इव्हॉल्विंग एक्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संस्थापक अमोल नितवे हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अमोल नितवे यांनी ‘नवोन्मेषी विचारसरणी, स्टार्टअप संस्कृती आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वास्तवातील समस्यांचे समाधान’ या विषयांवर मार्गदर्शन केले. ‘१८८४ साली आयईईई सदस्यांनी प्रथमच एकत्र येऊन आयट्रीपल ई दिन उत्सव साजरा करण्यास सुरूवात केली. जगभरात तांत्रिक कल्पनांची देवाण घेवाण करण्याच्या संदर्भात हा दिवस साजरा केला जातो. यावेळी अॅटलस स्किलटेक विद्यापीठाचे वरिष्ठ संचालक व प्राध्यापक डॉ. शशिकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना आयईईई उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्यास आणि नवोन्मेष आधारित शिक्षणाकडे वळण्यास प्रोत्साहित केले. यानंतर अमोल नितवे यांनी स्मार्ट इंडिया हॅकाथॉन (एस. आय. एच.) साठी निवडलेल्या संघांतील सदस्यांना विशेष मार्गदर्शन केले. संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजिलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती यांनी सर्व आयट्रीपलई संबंधित उपक्रमांचा आढावा सादर केला. आय.आय.सी.चे प्रेसिडेंट डॉ.दिग्विजय रोंगे यांनी संस्थात्मक आय. आय. सी. बाबत सविस्तर माहिती दिली. हा उपक्रम भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे सुंदर प्रतिबिंब होते आणि हा उपक्रम ‘मानवजातीसाठी तंत्रज्ञानाचा विकास’ या आयट्रीपलईच्या ब्रीदवाक्याची जाणीव करून देणारा ठरला. यासाठी सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. स्मिता गावडे यांनी काम पहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नीता तळवळकर, स्वरा तासगांवकर आणि समृद्धी मोरे यांनी केले तर आभार डॉ. दिग्विजय रोंगे यांनी मानले.

