सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर येथे शिक्षक पात्रता परीक्षा (TET) सक्तीविरोधी निर्णयावर शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन मूकमोर्चा काढला आणि शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी पाठींबा दर्शवला आहे. या मोर्चामध्ये रयत सेवक, शिक्षक भारतीचे सर्व पदाधिकारी, सदस्य, स्वेरीचे डॉ. बी. पी. रोंगे विविध शाळांमधील शिक्षक, संघटनांचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.
सर्वोच्च न्यायालयाने सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी TET अनिवार्य केल्याच्या निर्णयाविरोधात हा मोर्चा काढण्यात आला. व त्याचे निवेदन जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी यांना देण्यात आले.
शिक्षक संघटनांची महत्त्वपूर्ण मागणी म्हणजे राज्य सरकारने त्वरीत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी, जुन्या शिक्षकांना या नियमातून सवलत द्यावी, १५ मार्च २०२४ चा शिक्षकी संचमान्यतेबाबतचा निर्णय रद्द करावा, आणि वस्ती शाळा शिक्षक सेवासातत्य तसेच जुनी पेन्शन योजना लागू करावी.
शिक्षकांच्या सेवा, पात्रता, वेतनश्रेणी, सतत असलेला अव्यवहार्य तणाव आणि अतिरिक्त शाळाबाह्य कामे या बाबींवरही सरकारने ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी करण्यात आली.
मूक मोर्चात घोषवाक्यांनी (फलकांद्वारे) शिक्षकांच्या भावना आणि मागण्या मांडण्यात आल्या, परंतु कुठलेही गोंगाट, वक्तव्य किंवा घोषणा करण्यात आल्या नाहीत.
जर सरकारने हे मागण्या मान्य केल्या नाहीत वा तातडीने कारवाई केली नाही, तर आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार करण्यात आला आहे, तसेच २४ नोव्हेंबर रोजी शाळा बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
या मूक मोर्चाची गरज आणि ठळक मागण्या म्हणजे शिक्षकांच्या अधिकारांचे रक्षण, शिक्षण क्षेत्रातील असलेला अन्याय दूर करणे, आणि शासनाने लवकरात लवकर शिक्षकांच्या हितासाठी सकारात्मक पावले उचलावीत अशी अपेक्षा सर्व संघटनानी केली आहे.


