बीड प्रतिनिधी तेज न्यूज
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आलेल्या जीवेमारण्याच्या धमकी प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी बीड शहरात काही दिवसांपूर्वी गुप्त बैठकाही घेण्यात आल्या असल्याची माहिती खुद्द आरोपींनी दिलीय. यात जरांगे पाटलांच्या ओळखीतील काही जण उपस्थित होते. त्याच बैठकीत अडीच कोटी रुपयांची सुपारी ठरली होती, अशी ही माहिती जरांगे यांनी दिली.
खुने 2 वर्षे होता जेलमध्ये
कोपर्डी बलात्कारातील आरोपीवर न्यायालयाच्या परिसरात हल्ला केल्याप्रकरणी अमोल खुने हा आरोपी होता. त्याने आपल्या इतर सहकाऱ्यांसह हा हल्ला केला होता. तेव्हा तो जरांगेच्या शिवबा संघटनेचा कार्यकर्ता होता. या प्रकरणात तो दोन वर्षे जेलमध्ये होता. बाहेर आल्यानंतर खुने याने जरांगे पाटील यांच्यासोबत पुन्हा काम सुरू केले होते. आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान 15 एप्रिल 2024 रोजी अमोल खुनेवर हल्ला झाला होता. यावेळी जरांगे यांनी खुनेला पोलीस संरक्षणाची मागणी केली होती. .
असा उघड झाला प्रकार
बीड जिल्ह्यात मनोज जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचण्यात आला. यासंदर्भात तेथे काही गुप्त बैठकाही झाल्या. या बैठकीत जरांगे पाटील यांच्या जवळचा एक कार्यकर्ता उपस्थित होता. त्यानेच आंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांची भेट घेऊन या प्रकाराची त्यांना माहिती दिली.
झोपेत घात करण्याचा प्लॅन ?
या कटात जो सहभागी होता त्यानेच जरांगे पाटलांना या सर्व प्रकाराची माहिती दिली. तुम्ही जरांगे पाटील यांच्या जवळ असता, मग त्यांना झोपेचे किंवा गुंगीचे औषध देऊन पुढचे काम करा, अशा सूचना सुपारी देणाऱ्याने दिल्या अशी माहिती समोर आली आहे. हि माहिती ज्याने दिली त्याचे नावही जरांगे पाटील यांच्याकडे आहे. तसेच सर्व कॉल रेकॉर्डिंग देखील आहेत.
मोठ्या नेत्याचा हात ?
मनोज जरांगे यांच्या आरोपानुसार, हा सगळा कट एका मोठ्या नेत्यांने रचला होता, त्याचे पुरावे देखील आपल्याकडे असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आज सकाळी 11 वाजता अंतर्वली सराटीचे पत्रकार परिषद घेतील पुरावे ही सादर करतील, असं त्यांनी सांगितलं आहे. हा नेता कोण ? त्याचं नाव थेट जरांगे पाटील घेणार का ? जरांगे यांच्याकडे असलेले हत्येच्या कटाचे पुरावे पत्रकार परिषदेत समोर आणणार का ? या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आता पत्रकार परिषदमध्ये मिळतील.


