ऑक्टोबर, २०१८ साली आदरणीय चंद्रकांत दादांच्या संकल्पनेतून अपोलो रुग्णालयात लहान बालके आणि गरजू आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातील रुग्णांना
आशेचा किरण ठरणाऱ्या “आशा” योजनेच्या माध्यमातून ७०० हून अधिक रुग्णांवर मोफत जटिल शस्त्रक्रिया करण्यात आल्या . चंद्रकांत दादा पाटील यांची अपोलो प्रतिनिधींशी भेट
पुणे / नवी मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तसेच संसदीय कार्य मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आरोग्य क्षेत्रात गेल्या दहा वर्षांपासून अनेक नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत. दादांचे विश्वासू ओ.एस.डी. (आरोग्य विभाग प्रमुख) श्री. विकास ज्ञानू देशमुख यांच्या समन्वयातून या योजनांची अंमलबजावणी राज्यभर प्रभावीपणे होत आहे.
याच उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून, ऑक्टोबर २०१८ मध्ये आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते अपोलो रुग्णालय, नवी मुंबई येथे “आशा” या जनकल्याणकारी आरोग्य योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता.
या योजनेअंतर्गत आजपर्यंत ७०० हून अधिक लहान बालकांवर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांवर हृदयविकार तसेच इतर जटिल शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आल्या आहेत. तसेच, लिव्हर आणि किडनी ट्रान्सप्लांट यांसारख्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियांच्या माध्यमातून अनेक रुग्णांना नवजीवन प्राप्त झाले आहे.
या योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी अपोलो रुग्णालयाचे मुख्य लिव्हर प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. गुरुप्रसाद शेट्टी, मेडिकल डायरेक्टर डॉ. रवी शंकर, सी.ओ.ओ. डॉ. किरण शिंगोटे, देशभरातील अवयव प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख संजय सिंग आणि सहकारी तबरेज शिरगावकर यांनी आज चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान अपोलो रुग्णालयाच्या प्रतिनिधींनी “आशा” योजनेचा सविस्तर प्रगती अहवाल सादर केला. दादांनी यावेळी अपोलो समूहाचे प्रमुख डॉ. गुरुप्रसाद शेट्टी यांना मागील आठवड्यात आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळालेल्या सन्मानाबद्दल अभिनंदन केले.
दादांनी अपोलो रुग्णालयाच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करताना सांगितले की,“देशातील गोरगरीब आणि गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा पुरविण्याचे कार्य अपोलो रुग्णालयाने ‘आशा’ सारख्या प्रकल्पांद्वारे अत्यंत उल्लेखनीयपणे केले आहे. अशीच जनसेवेची भावना आणि सामाजिक जबाबदारी येणाऱ्या काळातही कायम ठेवावी,” असे दादांनी नमूद केले.
यावेळी दादांनी पुढे सांगितले की, अपोलो रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञता आणि महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांनी एकत्रित येऊन आरोग्य सेवा प्रकल्प राबविल्यास राज्यातील गोरगरीब जनतेला अत्याधुनिक वैद्यकीय उपचार मिळू शकतील, अशी प्रामाणिक अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शेवटी, चंद्रकांत दादा पाटील यांनी अपोलो रुग्णालयाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच विकास देशमुख यांच्या माध्यमातून उपचारासाठी येणाऱ्या सर्व रुग्णांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन अपोलो रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना केले.
अपोलो रुग्णालयाच्या प्रतिनिधींनी यावेळी सर्व रुग्णांना दादांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या वैद्यकीय सेवा व सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले.

