मार्गशीर्ष महिन्याकरिता श्रीपांडुरंगराय पंढरपूर पासून १|| किलोमीटर अंतरावरील गोपाळपूर नजिकच्या नदीपात्रातील मंदिरात मुक्कामास जातात. या मंदिरास "विष्णुपद मंदिर" म्हणतात. या ठिकाणी उमटलेली देवांची पदचिह्ने व गोखूर भक्तांची श्रद्धा द्विगुणित करतात.
मुख्य श्रीविठ्ठल मंदिरातील देवांच्या दिनचर्येतील नित्योपचारा प्रमाणेच महिनाभर येथेही देवांचे नित्योपचार केले जातात. वारकरी भाविक भक्त मोठ्या प्रमाणात येथे दर्शनासाठी येतात. सायंकाळी उपस्थित भक्तगणांकडून खड्या आवाजात म्हटल्या जाणाऱ्या विष्णुसहस्त्रनाम पाठ ऐकणे ही सुद्धा एक पर्वणीच असते.
भक्तांची अशी श्रध्दा आहे की, संत माऊली श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या समाधी सोहळ्यानंतर प्रत्यक्ष श्रीपांडुरंगराय खूप दुःखी, व्याकूळ झाले. संत मंडळींशिवाय त्यांना करमेना. त्यामुळेच त्यांनी मंदिराऐवजी या नदीपात्रातील "पदावर" बाळ-गोपाळ व गोमातेच्या संगतीत दिवस व्यतीत केले.
या पदावर दिवसभर भक्तांची मोठी गर्दी असतेच. विविध ठिकाणाहून शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी दिवसभर सहलीने या ठिकाणी येतात. तसेच गावकरी स्त्रीपुरुष डबा भोजनाचा आस्वाद घेतात.
लेखन रमेश घळसाशी


