पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे तेज न्यूज
पंढरपूर सायकलर्स क्लबचे सदस्य आणि देशसेवेत कार्यरत असलेले पॅरा कमांडो श्री. समाधान थोरात यांनी यंदाच्या गोवा हाफ आयर्नमॅन 70.3 या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवत पंढरपूर तालुक्याचा मान उंचावला आहे. पहिल्याच पदार्पणात त्यांनी ही कठीण त्रिस्पर्धा केवळ 5 तास 28 मिनिटांत पूर्ण करत आपली दमदार कामगिरी नोंदवली.
या स्पर्धेत स्पर्धकांना 1.9 कि.मी. पोहणे, 90 कि.मी. सायकलिंग आणि 21.2 कि.मी. धावणे असा एकूण टप्पा 8 तास 30 मिनिटांत पूर्ण करावा लागतो. त्यातही 5 तास 30 मिनिटांच्या आत स्पर्धा पूर्ण केल्यास वर्ल्ड हाफ आयर्नमॅन चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळते. समाधान थोरात यांनी पहिल्याच प्रयत्नात ही पात्रता मिळवत आपल्या जिद्दीचे व मेहनतीचे सर्वोत्तम उदाहरण साकारले.
यापूर्वी त्यांनी सायकलिंगमधील नामांकित डेक्कन क्लिप हॅंगर – पुणे टू गोवा (649 किमी) ही स्पर्धाही केवळ 35 तासांत पूर्ण करत उल्लेखनीय कामगिरी केली होती. दोन भिन्न आणि अत्यंत आव्हानात्मक स्पर्धांमध्ये मिळवलेल्या या दुहेरी यशाबद्दल समाधान थोरात यांचे विविध स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.
त्यांच्या या पराक्रमाबद्दल पंढरपूर सायकलर्स क्लबच्या वतीने समाधान थोरात यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला पंढरपूर सायकलर्स क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते. आगामी स्पर्धांसाठी थोरात यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

