सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
करमाळा नगरपालिका निवडणुकांपूर्वी शिवसेना शिंदे सेनेला मोठा धक्का बसल्याचं चित्र आहे. करमाळा विधानसभा निवडणूक लढवलेल्या दिग्विजय बागल यांच्यासह 55 शाखाप्रमुखांनी आणि जवळपास 20 हजार शिवसैनिकांनी पक्षाकडे सामूहिक राजीनामे पाठवत सोडचिठ्ठी दिली आहे. हे सगळेजण आता भाजपच्या वाटेवर असल्याची शक्यता असून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तसे संकेतही दिले आहेत. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर हा शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
करमाळा विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढविलेले दिग्विजय बागल यांनी त्यांचे सर्व पदाधिकारी, शाखाप्रमुख आणि शिवसैनिकासह सामूहिक राजीनामे पाठवले आहेत. दिग्विजय बागल हे माजी मंत्री स्व. दिग्विजय बागल आणि माजी आमदार श्यामल बागल यांचे पुत्र आहेत. त्यांच्या पाठीशी करमाळ्यात एक मोठा गट कार्यरत आहे.
अंतर्गत वादातून सामूहिक राजीनामे
काही दिवसापूर्वी जिल्हाप्रमुख महेश चिवटे आणि दिग्विजय बागल यांच्यात सुरू असलेला वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला होता. यातूनच मंगेश चिवटे यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांना शिवसेनेत आणून त्यांच्यावर करमाळा नगरपालिका निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी दिली होती. त्यामुळे दिग्विजय बागल यांचे समर्थक संतप्त झाले होते. यातूनच आता दिग्विजय बागल यांच्यासह 55 शाखा प्रमुख आणि त्यांनी नोंदवलेले जवळपास 20 हजार शिवसैनिकांनी सामूहिक राजीनामे पाठवले आहेत.
बागल गट भाजपच्या वाटेवर
दरम्यान, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिग्विजय बागल हे भाजपमध्ये येतील असे संकेत दिले आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर करमाळा नगरपालिकेतील सत्ताधारी शिंदे सेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.


