राहुरी प्रतिनिधी श्रेयस लोळगे तेज न्यूज
राहुरी शहरातील अग्रगण्य सामाजिक संस्था नाथ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित भव्य रास-दांडिया महोत्सव शुक्रवार, २६ सप्टेंबरपासून जल्लोषात सुरू झाला. १ ऑक्टोबरपर्यंत चाललेल्या या महोत्सवात दररोज रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेतील विद्यार्थिनींसाठी सायंकाळी ७ ते ८.३० आणि महिलांसाठी व युवतींसाठी रात्री ८.३० ते ११ या वेळेत गरबा-दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे सर्व सहभागींसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला होता, यामुळे महिलांचा आणि युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या महोत्सवात ग्रुप डान्स, सोलो डान्स, तसेच दांडिया ग्रुप स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये सहभागी महिलांची संख्याही लक्षणीय होती. स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या विजेत्यांना दररोज १० आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती. यामध्ये श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर, माजी नगराध्यक्षा डॉ. सौ. उषाताई तनपुरे, ओजस्विनी पतसंस्थेच्या चेअरमन सुजाता तनपुरे, शालिनी उंडे, तसेच सीमा उंडे यांची विशेष उपस्थिती होती.
नाथ प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे राहुरीतील महिलांना संस्कृती, उत्सव आणि सहभागाचा एक हृदयस्पर्शी अनुभव मिळाला. नाथ प्रतिष्ठानचे संस्थापक सौरभ उंडे यांच्या नियोजनबद्धतेचे व सांस्कृतिक संवेदनशीलतेचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.

