माळशिरस प्रतिनिधी तेज न्यूज
प्रत्येक शालेय मूल रोज शाळेत येते, पण आपण शिक्षक या नात्याने या मुलाच्या घरी पोहोचलो आहोत का ? या प्रश्नातूनच या उपक्रमाचा जन्म झाला असे मत उपक्रमशील शिक्षक दिपक परचंडे यांनी सांगितले.
"शिक्षक आपल्या दारी" या नाविन्यपूर्ण उपक्रमाची अंमलबजावणी जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा कदमवाडी नं. 2 शाळेचे उपक्रमशील शिक्षक दिपक परचंडे यांच्या संकल्पनेतून ऐन दिवाळीची सुट्टी असतानाही हा उपक्रम प्रभावीपणे राबवला. "शिक्षक आपल्या दारी " या उपक्रमामध्ये कोणतीही पूर्व सूचना न देता विद्यार्थ्यांच्या घरी अचानक जाण्यामुळे पालकांनी औक्षण करून माझे स्वागत केले, या स्वागतामुळे खरोखरच मीही भारावून गेलो.
दिवाळीच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना दिलेला अभ्यासक्रम, बनवलेल्या गडकिल्ल्यांची प्रतिकृती पाहणे, विद्यार्थ्यांच्या घरचे वातावरण, पालकांची परिस्थिती, घरी अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी, शिक्षक - पालक नातेसंबंध, दिवाळीची सुट्टी असतानाही, "सर माझ्या घरी आले", अचानक पणे घरी येण्यामुळे विद्यार्थ्यांना होणारा आनंद, विद्यार्थी आणि पालक यांच्यातील समस्या, त्यांच्या समस्यांचे निराकरण, शाळा व मळा यांच्यातील अंतर, विद्यार्थी मोबाईल पासून कसा दूर राहील याबद्दल मार्गदर्शन या सर्व बाबींवर चर्चा करून मार्गदर्शन करणे. या उपक्रमामुळे शिक्षक आणि पालक यांच्यातील नातेसंबंध दृढ होऊन निश्चित या नातेसंबंधाचा फायदा शाळेचा विकास होण्यासाठी मदत होईल. या उपक्रमामुळे पालकांचा मराठी शाळेविषयी असणारा दृष्टिकोन बदलण्यास नक्की मदत होईल असे मत शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत जाधव यांनी व्यक्त केले.
या उपक्रमाचे शाळेचे पालक दिलीप कदम, सतीश बाबर, तुकाराम कदम, विठ्ठल कदम, ज्ञानेश्वर बाबर, युवराज बाबर, समाधान कांबळे, समित कदम, दादासाहेब केदार,अश्विनी माने,सोनाली कदम, स्वप्नाली बाबर,वंदना धनवडे यांनी कौतुक केले.