कराड प्रतिनिधी तेज न्यूज
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड येथे जागतिक नदी दिनानिमित्त ग्रीन क्लब आणि हाऊस ऑफ आर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पर्यावरण संवर्धन आणि जलसंपत्तीचे महत्त्व पटवून देण्यासाठी या कार्यक्रमांतर्गत पोस्टर मेकिंग स्पर्धा आणि नदीविषयक क्विझ स्पर्धा घेण्यात आल्या.
पोस्टर मेकिंग स्पर्धा या स्पर्धेसाठी “हरित राहा, स्वच्छ जगा”, “झाडे वाचवा, जीवन वाचवा”, “पाणी आहे जीवन – प्रत्येक थेंब वाचवा”, “प्लास्टिक प्रदूषणावर मात करा” आणि “कचऱ्याचे सोनं – पुनर्वापर, पुनर्निर्मिती, पुनर्विचार” असे विषय देण्यात आले होते. एकूण ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला. या स्पर्धेत प्राची कल्याणकर यांनी प्रथम, विशाखा बावनकुळे यांनी द्वितीय, तर श्रेया सूर्यवंशी यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
नदीविषयक क्विझ स्पर्धा या स्पर्धेत ४३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी नदी संवर्धन, जलस्रोतांचे महत्त्व आणि पर्यावरणविषयक प्रश्नांना उत्तरे देत आपले ज्ञान प्रदर्शित केले. या स्पर्धेत सार्थक मून यांनी प्रथम, प्राची कल्याणकर यांनी द्वितीय, तर अक्षता चौगुले यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
या दोन्ही उपक्रमांचे आयोजन ग्रीन क्लबच्या सदस्यांनी अत्यंत उत्कृष्टरीत्या पार पाडले. पारितोषिक वितरण समारंभ डॉ. के. एन. आळसुंदकर, एस. एस. यादव, एस. ए. मोरखडे आणि पी. एच. कांबळे यांच्या हस्ते पार पडला. प्राध्यापकांनी विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, नदी रक्षण आणि शाश्वत विकासाबाबत जागरूकता निर्माण झाली. “नदी वाचवा, जीवन वाचवा” हा संदेश विद्यार्थ्यांमार्फत समाजापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश या कार्यक्रमाद्वारे यशस्वीरीत्या साध्य झाला.
या यशस्वी आयोजनात सोनाली जाधव, निखिल पाटील, सुजीत गुंजाळ, स्नेहल पाटील, प्रिती माळवदे तसेच सर्व क्लब समन्वयकांचे योगदान उल्लेखनीय राहिले.