अकलूज प्रतिनिधी तेज न्यूज
महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर येथे वन्यजीव सप्ताह अंतर्गत राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून दिनांक २ ऑक्टोंबर पासून विविध जनजागृती पर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांमधून विद्यार्थी व नागरिकांमध्ये वन्यजीवांचे संरक्षण आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली.
हरित सेनेचा हिरवा संदेश देण्याच्या उद्देशाने प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.सप्ताहाच्या आयोजनात चित्रकला स्पर्धा ,निबंध लेखन स्पर्धा ,व्याख्यान वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रमाचा समावेश करण्यात आला.
सर्व विद्यार्थ्यांची माझे निसर्ग, माझा आवडता प्राणी या विषयांवर चित्रकला स्पर्धा राबवण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी आपल्या कुंचल्यातून वन्यजीवांचे व निसर्गाचे अप्रतिम चित्रण केले. चित्रकला स्पर्धेत उत्कृष्ट चित्र रेखाटनासाठी गुंजन कारमकर ,आशिष लोहार, निहान मुलाणी, मुदस्सर शेख या विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावले.
वन्यजीव संरक्षणाची गरज या विषयावर निबंध स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांच्या मन:पटलावर भावी पिढीसाठी हिरवे भविष्य गरजेचे असल्याचा संदेश प्रतिबिंबित करण्यात आला. निबंध लेखन स्पर्धेत वृषाली कारमकर ,शिवांश खुसपेव इमरान काझी यांनी अव्वल स्थानाचे मानांकन मिळवले. प्राध्यापक धनंजय देशमुख यांनी आपल्या व्याख्यानात वृक्षांचे महत्त्व जतन व संवर्धन याविषयी माहिती सांगितली.
प्रशालेतील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांमार्फत परिसरात वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले. वन्यजीव वाचवा ,झाडे वाचवा व पर्यावरण वाचवा या घोषवाक्यांसह झाडांचे महत्त्व पटवून देणारे फलक हातात घेऊन जनजागृती करण्यात आली.
वृक्षदिंडीच्या सांगता प्रसंगी प्रशालेच्या परिसरात 50 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले .यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरणाची काळजी घेण्याची शपथ घेतली.
या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी व नागरिकांनी सहभाग घेतला. सदर वन्यजीव सप्ताह आयोजन उपक्रमांसाठी श्रीम. ए आर ससाने वनक्षेत्रपाल माळशिरस ,श्री.एस जे पावणे वनरक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.
या उपक्रमांतून आजचे वृक्षारोपण उद्याचा श्वास असल्याचे ध्येय विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्यास मदत होईल.

