बार्शीच्या प्रतिनिधी तेज न्यूज
बार्शीच्या राजकीय पटावर आज एक मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि धाराशिव जिल्हा निरीक्षकपदाचा राजीनामा देत ऍडव्होकेट सुप्रिया गुंड-पाटील यांनी नव्या राजकीय वाटचालीची सुरुवात केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे बार्शीच्या नगरपरिषदेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कार्यकर्ता म्हणून कार्यरत असलेल्या ऍड. सुप्रिया गुंड-पाटील यांनी सच्च्या कार्यकर्त्याच्या भूमिकेतून आपला प्रवास सुरु केला. संघटन कौशल्य, सखोल अभ्यास, मधुर वाणी आणि सातत्यपूर्ण जनसंपर्क या गुणांच्या बळावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदापर्यंत पोहोचलेल्या गुंड-पाटील यांना अनेक सामाजिक व राजकीय चळवळींमध्ये सक्रियपणे सहभागी झाल्यामुळे ओळखले जाते.
मात्र, बार्शी नगरपालिकेच्या निवडणुका अगदी उंबरठ्यावर असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोडल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चेला उधाण आले आहे.
नगराध्यक्ष पदासाठी रेस तापली!
बार्शी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण जाहीर झाल्याने या पदासाठी शहरात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. या रेसमध्ये उज्वला सोपल, निर्मला बारबोले, वर्षाताई ठोंबरे, तेजस्विनी कथले, कल्पना अक्कलकोटे, सुनीता शेळके आणि मंगल शेळवणे या नावांची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू असतानाच आता ऍड. सुप्रिया गुंड-पाटील यांचेही नाव अग्रक्रमावर येऊ लागले आहे.
2024 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीपासून ऍड. गुंड-पाटील यांची माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाशी जवळीक निर्माण झाली होती. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी राऊत गटाच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यामुळे येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत राऊत गटातून त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळणार का, यावर राजकीय चर्चा रंगली आहे.
“राऊत गटातून संधी मिळाल्यास निवडणूक लढविण्यास तयार” — ऍड. गुंड-पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजीनाम्यानंतर संपर्क साधल्यावर ऍड. सुप्रिया गुंड-पाटील यांनी, “माजी आमदार राजेंद्र राऊत गटातून संधी दिल्यास नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढविण्यास तयार आहे,”अशी थेट आणि स्पष्ट भूमिका मांडली. त्यांच्या या विधानाने राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे.
बार्शीच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल...
ऍड. सुप्रिया गुंड-पाटील या अभ्यासू, संपर्कसंपन्न आणि जनतेशी थेट नातं राखणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा राजीनामा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात मोठा धक्का मानला जात आहे, तर दुसरीकडे राऊत गटासाठी ही एक मजबूत भर ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
स्थानिक राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, महिलांसाठी आरक्षित नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत गुंड-पाटील या बलाढ्य उमेदवार ठरू शकतात. त्यांचा अनुभव, संघटन कौशल्य आणि जनसंपर्क यामुळे त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बार्शीतील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असताना, ऍड. सुप्रिया गुंड-पाटील यांच्या या निर्णयाने आगामी निवडणुकीचा रंगच पालटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत!

