पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट् संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागात ‘पीसीबी डिझाईन आणि डेव्हलपमेंट’ या विषयावर तब्बल १२ दिवसांची कार्यशाळा संपन्न झाली. तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा ऑफलाइन मोडमध्ये या विभागात घेण्यात आली.
संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार यांच्या सहकार्याने, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार व विभागप्रमुख डॉ. सुमंत आनंद यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ही कार्यशाळा सॉफकॉन् इंडिया प्रा. लि., पुणे च्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. शुभम शर्मा आणि शिवम मिश्रा हे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून या कार्यशाळेत उपस्थित होते.
डॉ. सुदेम डॅमरि यांनी या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहिले. कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना प्रिंटेड सर्किट बोर्ड (पीसीबी) डिझाईन आणि निर्मिती याबद्दल सखोल ज्ञान देणे हा होता. कार्यशाळेच्या सुरुवातीला पीसीबी चे प्रकार, त्याचा स्तर तसेच साहित्य आणि घटकांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना अल्टीअम सॉफ्टवेअर वापरून स्कीमॅटिक आणि लेआउट डिझाईन शिकवण्यात आले. हाताळणी सत्रांमध्ये स्कीमॅटिक डिझाईन, नेटलिस्ट तयार करणे, फुटप्रिंट असाइन करणे, एरर चेकिंग या बाबींचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी पूर्ण-वेव ब्रिज रेक्टिफायरसह एसी ते डीसी कन्व्हर्टर आणि टायमर व सीडी ४०१७ आधारित एलइडी चेसर सर्किट यांसारख्या प्रॅक्टिकल सर्किटवर काम केले. त्यानंतर घटकांची मांडणी, राउटिंग तंत्र, लेअर स्टॅकअप, ग्राउंड प्लेन, इआरसी/ डीआरसी तपासणी, जेरबर फाइल जनरेशन, बीओएम तयार करणे आणि थ्रीडी डिझाईन रिव्ह्यू यासारख्या प्रगत विषयांचा उहापोह करण्यात आला. विद्यार्थ्यांना पीसीबी निर्मिती प्रक्रिया जसे की एचिंग, सोल्डर मास्क, सिल्कस्क्रीन, व्हाया प्लेटिंग, असेंब्ली तंत्रज्ञान (एसएमटी व टीएचटी) आणि पीसीबी टेस्टिंग पद्धती याबद्दल सविस्तर माहिती दिली. कार्यशाळेचा समारोप मिनी-प्रोजेक्ट ने झाला, जिथे विद्यार्थ्यांनी स्कीमॅटिक्स डिझाइन करणे, पीसीबी लेआउट तयार करणे, जेरबर फाइल्स जनरेट करणे आणि मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली प्रोजेक्ट अंतिम रूपात सादर केले. विद्यार्थ्यांनी आपले प्रोजेक्ट रिपोर्ट पाच जणांच्या गटात सादर केले.
ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली, ज्यामुळे पीसीबी डिझाईन आणि डेव्हलपमेंट मधील कौशल्ये प्रभावीपणे विकसित झाली. या कार्यशाळेत जवळपास १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. डॉ. नीता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

