पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागात विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी उंची देणाऱ्या महत्त्वाच्या क्षणांपैकी एक म्हणजे GATE परीक्षा. याच परीक्षेची तयारी प्रभावी आणि यशस्वी करण्यासाठी "GATE परीक्षेनंतरच्या संधी" या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जे. करांडे यांनी केले, तर उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांचीही या सत्रास उपस्थिती लाभली. यांत्रिकी अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना GATE परीक्षेचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. चेतन विजयकुमार पापडे (सहाय्यक प्राध्यापक, यांत्रिकी अभियांत्रिकी विभाग, N. K. Orchid College of Engineering & Technology, सोलापूर) उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचा परिचय GATE समन्वयक डॉ. ए. एस. आराध्ये यांनी करून दिला, तर सत्राचे समन्वयन प्रा. लक्ष्मीकांत जोशी यांनी केले.
डॉ. पापडे यांनी विद्यार्थ्यांना GATE परीक्षेनंतर उपलब्ध होणाऱ्या उच्च शिक्षण, शासकीय सेवा, उद्योग क्षेत्रातील करिअर संधी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच, त्यांनी वेळेचे व्यवस्थापन, अभ्यासाची योग्य पद्धत, भविष्यातील करिअर नियोजन याबाबत विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी माहिती दिली.
या मार्गदर्शन सत्राला यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. विद्यार्थ्यांकडून या सत्रास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
महाविद्यालयाने असे सत्र नियमितपणे घेण्याचा निर्धार व्यक्त केला असून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा संधींचे महत्त्व अधोरेखित केले आहे.