ACSpire ऑनलाईन व्याख्यानमालिका अंतर्गत विद्यार्थ्यांना आधुनिक सॉफ्टवेअर करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथील सिंहगड इन्स्टिट्यूटच्या संगणक अभियांत्रिकी विभाग व संगणक अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ACSpire Online Lecture Series अंतर्गत, मायक्रोसॉफ्ट, रेडमंड (USA) येथील प्रिन्सिपल सॉफ्टवेअर इंजिनिअर श्री. सुरज देशमुख यांचे ऑनलाईन मार्गदर्शन नुकतेच पार पडले असल्याची माहिती संगणक विभाग प्रमुख डॉ. सुभाष पिंगळे यांनी दिली .
"क्लाऊड-नेटिव्ह टेक्नॉलॉजी व सॉफ्टवेअर नवोन्मेष : करिअरचा पर्याय" या विषयावर आधारित या विशेष सत्रात, श्री. देशमुख यांनी विद्यार्थ्यांना Kubernetes, Docker, OpenShift, GoLang, कंटेनर ऑर्केस्ट्रेशन आणि सिस्टीम सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग या अत्याधुनिक तंत्रज्ञानांची सखोल माहिती दिली.
श्री. सुरज देशमुख हे सॉफ्टवेअर उद्योगातील अत्यंत अनुभवी तज्ज्ञ असून त्यांनी Red Hat, Kinvolk आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर काम केले आहे. तसेच ते Bangalore Kubernetes Meetup चे मुख्य संयोजकही राहिले असून, उद्योग व शैक्षणिक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान प्रसारात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.
सत्रादरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून, "उद्योजकता व नवोन्मेष हेच भविष्यातील यशाचे गमक आहे," असे सांगून संशोधन, स्टार्टअप्स आणि नाविन्यपूर्ण कल्पनांच्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन केले.
या ऑनलाईन व्याख्यानात संगणक अभियांत्रिकी विभागातील १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्टार्टअप्स आणि इनोव्हेशनबद्दल नवचैतन्य निर्माण झाले असून, तंत्रज्ञानाच्या नव्या क्षितिजांची ओळख मिळाल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन संगणक अभियांत्रिकी विभाग आणि संगणक अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची संघटना यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आले. सत्राची सांगता प्रा. सुमीत इंगोले यांच्या आभारप्रदर्शनाने झाली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.