पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात गुणवत्ता हमी कक्ष आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लिंग संवेदनशीलता आणि जागरूकता’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड येथील महाराष्ट्र राज्य ट्रान्सजेंडर हक्क संरक्षण मंडळाच्या सह-उपाध्यक्षा डॉ. सान्वी जेठवाणी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बाळासाहेब बळवंत हे होते. तर विशेष उपस्थिती म्हणून विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा. डॉ. केदारनाथ काळवणे यांनी हजेरी लावली.
प्रमुख पाहुणे व मुख्य वक्त्या डॉ. सान्वी जेठवाणी म्हणाल्या की, “भारतीय समाजाने तृतीयपंथीयांकडे आजही उपेक्षित नजरेने पाहिले जाते. मात्र ते सुद्धा माणूस आहेत आणि त्यांना जगण्याचा हक्क आहे. शिक्षण, आरोग्य व सामाजिक स्वीकार मिळाल्यास तृतीयपंथीय समाजामध्ये सकारात्मक बदल घडू शकतो.” यावेळी यांनी तृतीयपंथीय समाजाचा ऐतिहासिक प्रवास मांडताना महाभारत, पुराण, रामायणातील उल्लेख, मोगल काळातील नर्तक म्हणून स्थान, ब्रिटिशकालीन कायदे तसेच आजच्या सामाजिक वास्तवाचा आढावा घेतला. या प्रसंगी डॉ. केदारनाथ काळवणे यांनी सोलापूर विद्यापीठ हे देशातील एकमेव विद्यापीठ असून, ट्रान्सजेंडर समाजासाठी विविध उपक्रम राबवले जात असल्याची माहिती दिली. त्यांनी तृतीयपंथीयांना शिक्षण, आरोग्य, उद्योगाच्या संधी देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज अधोरेखित केली.
अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्राचार्य डॉ. बाळासाहेब बळवंत यांनी ‘कर्मवीर भाऊराव पाटील यांनी समाजातील वंचित घटकांसाठी दिलेले योगदान अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना उपेक्षित घटकांकडे उदार अंतःकरणाने पाहण्याचे आवाहन केले.’
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सारिका भांगे यांनी केले. तर मराठी विभाग प्रमुख डॉ. रमेश शिंदे यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमास महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. भगवान नाईकनवरे, उपप्राचार्य डॉ. राजेश कवडे, उपप्राचार्य डॉ. महेंद्र गजधने, प्रा. डॉ. सुशीलकुमार शिंदे, डॉ. दत्तात्रय डांगे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच कला, वाणिज्य, विज्ञान, मास मीडिया, बी.व्होक. या विभागांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. अमर कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

