माज
महाराष्ट्राचा इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत तुकाराम, संत नामदेव, ज्ञानेश्वर माऊली, गाडगेबाबा, अहिल्याबाई होळकर अशा थोर थोर महापुरुषांच्या कार्याने उजळलेला आहे. या सर्वांचे विचार, जीवन आणि कर्तृत्व समाजासाठी प्रेरणादायी ठरले. म्हणूनच महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाने त्यांना मनोमन जागा दिली आहे.
परंतु आजच्या काळात काही स्वार्थी प्रवृत्ती जाती-धर्मांच्या नावाखाली समाजात भांडणं लावतात. तात्पुरत्या माजाच्या भरात या प्रवृत्ती सामान्य जनतेचे आयुष्य ढवळून काढतात. काही दिवस टिकणारा हा माज नंतर ओसरतो; पण तोवर सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक पातळीवर गोंधळ निर्माण होतो. यात सर्वाधिक भरडला जातो तो सर्वसामान्य माणूस. “आगीत तेल घालून लोणी खाण्याचा” उद्योग मात्र सतत सुरूच राहतो.
निसर्ग मात्र कुणाशीही भेदभाव करत नाही. ऊन, वारा, पाऊस सगळ्यांना सारखेच मिळतात. मेहनतीचे फळ मेहनतकऱ्यालाच मिळते. चांगल्या कर्मामुळेच व्यक्तीची कीर्ती समाजात अमर होते. हे तत्व विसरल्यामुळेच माणूस आयुष्यभर “माझं-माझं, तुझं-तुझं” करत धावपळ करतो; पण मृत्यू कधी दारात येतो, हे कुणालाच कळत नाही.
शेवटच्या क्षणी वैभव,संपत्ती,पदव्या काहीच सोबत नसतात. फक्त सोबत राहतात ती आपल्या कमावलेल्या नात्यांची सावली. मृत्यूनंतर ना “साहेब”, ना “शेठ”,ना "दादा" कोणत्याही पदवीचा उपयोग नसतो. एकच आवाज कानावर पडतो, “आवरा… आवरा!”
मृत्यूनंतर लागणारी माती कोणत्याही जातीची नसते, चितेसाठी लागणारी लाकडे कोणत्याही धर्माची नसतात. पिंडदानाला येणारा कावळाही कुठल्या जातीचा असतो ? अस्थी जेव्हा नदीत मिसळतात, तेव्हा त्यातून एकच संदेश ऐकू येतो-“तू कोणत्या जातीचा ? कोणत्या धर्माचा ?”
म्हणूनच आयुष्य जगताना सर्व प्रकारचे माज विसरून मानवतेने जगणं हाच खरा मार्ग आहे. थोर महापुरुषांना जातधर्माचा माज नव्हता, म्हणूनच ते आजही समाजात जिवंत आहेत. त्यांची आठवण, त्यांचा सुगंध प्रत्येक मराठी माणसाच्या कपाळावरच्या टिळ्यात सामावलेला आहे.
प्रा.आनंद आलदर

