सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
आपल्या बाळाप्रमाणे बागेतल्या झाडांची काळजी घेतली तर आपली बागही सतत हसरी राहुन आपला आनंद द्विगुणित करते.या आनंदात उत्तरोत्तर भरच घालायची असेल तर बागकर्मींनी बागेतल्या प्रत्येक झाडाची मोठ्या निगुतीनें देखभाल करुन झाडांचा टवटवीतपणा कायम ठेवावा हे आनंदाचं गुपीत ज्येष्ठ बाग कर्मी सौ.गुरुचरण गेहदु यांनी उलगडुन सांगितले.
परसबाग सोलापूरच्यावतीनें बागकर्मींसाठी " भेटु या बागकर्मींना..." या बागभेट उपक्रमाच्या चौथ्या सत्रात उपस्थित बागकर्मींना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
झाडांचं जगणं माणसाप्रमाणेच असतं. झाडांना झाडांच्याच संगतीत, सहवासात राहणं,वाढणं आवडतं.झाडांना झाडांचीच संगत सोबत हवी असते.बागकर्मी अशा संगतप्रिय झाडांना स्वतःच्या उपयोगासाठी व आनंदासाठी आपल्या बागेतल्या कुंडीमध्ये किंवा अनैसर्गिक वातावरणात आणुन स्थापित करत असतात.त्यामुळेच तर बागकर्मींची पालकत्वाची जबाबदारी वाढते.त्यामुळे झाडांना सातत्याने निकोप ठेऊन बागकामाचा खरा आनंद मिळवायचा असेल तर झाडांशी समरस होऊन निगुतीनें बागकर्म कला अंगिकारली तर दैनंदिन बागकर्म निकोप व निरोगी आनंद देऊ शकते असा स्वानुभव सौ.गेहदु यांनी यानिमित्ताने सांगितला.
प्रारंभी परसबागचे कार्यसमन्वयक श्री.शिरीष गोळवलकर यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले.संस्कारातून पर्यावरणाचे संवर्धन ही परसबाग ची कार्यसंकल्पना आहे.त्या अंतर्गत हा उपक्रम राबविला जात असल्याचे स्पष्ट केले. परसबागचे संस्थापक श्री.नारायण पाटील यांनी बागकर्मींनी परस्परांना दैनंदिन बागकामातील स्वतःचे अनुभव, प्रयोग, देखभाली संदर्भातील टीप्सचे सहजभावानें आदान- प्रदान करत परस्परांचे दैनंदिन बागकर्म समृध्द तथा श्रीमंत करावे असे आवाहन केले.या उपक्रमाचे हेच मुख्य फलित आहे. प्रत्येक बागकर्मींपर्यंत ते पोहोचायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली.
त्यानंतर परिचय व शंका समाधान सत्र पार पडले. सौ.गेहदु आजींची बागेतील झाडांची शिस्तबद्धव शास्त्रशुद्ध मांडणी,आखणी, विविधता असणा-या झाडांच्या देखभालीची माहिती मिळाल्याद्दल उपस्थित बागकर्मींनी कृतज्ञतापूर्वक आभार मानले.सौ.अंजली इंगळे, शुभदा पाटील,वैशाली कुलकर्णी, डॉ.रचना कपुर,श्री.ज्ञानेश्वर कोंगे,श्री.जयंत व सौ.मेधा पुराणीक,जयश्री हुच्चे,वैरागहुन सविता सरडे, इन्नुस पठाण यांच्यासह ४० बाग कर्मींनी सहभाग घेतला.

