विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्याख्यानांचे आयोजन.
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये अभियांत्रिकीच्या विविध शाखांमध्ये प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्याख्यानांचे आयोजन महाविद्यालयामार्फत केले होते. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचा इंजिनिअरिंग दृष्टिकोन, व्यक्तिमत्व विकास, अशक्य ते शक्य, कायदा आणि समृद्ध युवा अशा विविध विषयावरील व्याख्यानांमधून विद्यार्थ्यांना नवीन ऊर्जा मिळाली अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली.
प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या इंडक्शन प्रोग्राम २०२५ अंतर्गत दिनांक २९ ऑक्टोबर ते ४ सप्टेंबर दरम्यान या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. २९ ऑक्टोबर रोजी एडवोकेट आशुतोष बडवे यांनी "श्री छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचा इंजिनिअरिंग दृष्टिकोन" या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. आशुतोष बडवे हे निष्णात वकील असून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी त्यांचा गाढा अभ्यास आहे. तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचे खूप मोठे योगदान आहे.
३०/८/२०२५ रोजी प्रा.राजकुमार बाके यांचे "पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट" या विषयावर व्याख्यान झाले.यामध्ये त्यांनी आदर्श व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडून सांगितले.
दि.१/९/२०२५ रोजी समाज प्रबोधक श्री देवा चव्हाण यांनी "अशक्य ते शक्य" या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या व्याख्यानांमधून त्यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले व त्यांना प्रेरित केले. दिनांक २/ ९/२०२५ रोजी सोलापूर येथील आस्क अकॅडमीचे डायरेक्टर मिस्टर रोहन कुर्री यांनी इंडस्ट्रीच्या विद्यार्थ्यांकडून असलेल्या अपेक्षा व त्या पूर्णत्वास नेण्यासाठी विद्यार्थ्यांनी करावयाची तयारी याबद्दलचे मार्गदर्शन केले.
दि.३/९/ २०२५ रोजी एडवोकेट संदीप कागदे यांनी "कायदा आणि समृद्ध युवा" या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना गरजेच्या असलेल्या सर्व कायद्याविषयीचे सखोल मार्गदर्शन केले.
दिनांक ४/९/२०२५ रोजी सर्व प्रथम वर्षा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना सोलापूर येथील सायन्स सेंटर मधील तारामंडल व गॅलरी यांच्या इंडस्ट्रियल व्हिजिट साठी नेण्यात आले.अशा प्रकारे विविध प्रेरणादायी व्याख्यानांमधून प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रेरित केले गेले.
सदर उपक्रमास श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. ए बी कणसे, रजिस्ट्रार जी डी वाळके, उपप्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. राहुल पांचाळ, विभाग प्रमुख डॉ. एस एम लंबे, डॉ. एस व्ही एकलारकर, प्रा. ए टी बाबर, प्रा. दीपक भोसले, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. मोहसीन शेख तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

