पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभाग आणि इंनोव्हेशन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने "सिग्नल कंडिशनिंग अँड प्रोसेसिंग फॉर सेन्सर-बेस्ड मायक्रोकंट्रोलर सिस्टीम" या विषयावर एक विशेष तांत्रिक व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून श्री. धीरज मुत्तीन, संस्थापक व संचालक, Starrobot Automation Pvt. Ltd., पुणे हे उपस्थित होते. व्याख्यानाचे आयोजन प्रा. ए. डी. हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
श्री. मुत्तीन यांनी आपल्या सखोल मार्गदर्शनात सेन्सरमधून मिळणाऱ्या सिग्नलचे ऍम्प्लिफिकेशन, फिल्टरिंग, ॲनालॉग-टू-डिजिटल कन्व्हर्जन या प्रक्रियांचे तांत्रिक महत्त्व स्पष्ट केले. तसेच मायक्रोकंट्रोलरच्या माध्यमातून या सिग्नलचे प्रोसेसिंग करून IoT डिव्हाइसेस, बायोमेडिकल सिस्टीम, रोबोटिक्स व इंडस्ट्रियल ऑटोमेशन यामध्ये कसा वापर होतो, याचे विवेचन केले.
यासोबतच, सेन्सर इंटिग्रेशनमधील अडचणी, नॉईज रिडक्शन तंत्रज्ञान, तसेच एम्बेडेड सिस्टीम डिझाईन संदर्भातही विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आले. या क्षेत्राशी संबंधित करिअरच्या संधींवरही त्यांनी सखोल माहिती दिली. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, के पी आय टी टेक्नॉलॉजी, एल अँड टी टेक्नॉलॉजी, ऍक्लिव्हिस टेक्नॉलॉजी, डीप सी इलेक्ट्रॉनिक्स अशा नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमाच्या शेवटी झालेल्या प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी विद्यार्थ्यांच्या शंका तज्ज्ञांनी सोप्या भाषेत समजावून सांगितल्या.
विभागप्रमुख डॉ. ए. ओ. मुलाणी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करत तज्ज्ञांचे आभार मानले. त्यांनी असेही सांगितले की, अशा प्रकारच्या व्याख्यानांमधून विद्यार्थ्यांना संशोधन व करिअरविषयक प्रेरणा मिळते.
या कार्यक्रमात १०६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, तसेच विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभागातील सर्व शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

