पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर येथील प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागाच्या वतीने, सर्व शाखांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस प्लेसमेंटसाठी उपयुक्त ठरेल असे २५ दिवसांचे " जावा प्रोग्रॅमिंग " प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असल्याची माहिती महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. हे प्रशिक्षण १४ जुलै २०२५ ते १२ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राबवले गेले.
आजच्या स्पर्धात्मक युगात चांगल्या कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी केवळ शैक्षणिक गुणवत्ता पुरेशी नसून, तांत्रिक कौशल्ये आणि व्यावसायिक ज्ञान असणे तितकेच आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देऊन कॅम्पस प्लेसमेंटसाठी सज्ज करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना जावा प्रोग्रामिंगची मूलभूत व सखोल माहिती, ऑब्जेक्ट ओरीएंटेड प्रोग्रॅमिंग सैद्धांतिक व प्रात्यक्षिक ज्ञान, डेटा स्ट्रक्चर्स, अल्गोरिदम्स व प्रोजेक्ट डेव्हलपमेंट इत्यादिची सखोल माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणासाठी महाविद्यालयातील अंतिम वर्षात शिकणा-या १९३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक श्री. तरुण दोलाई आणि श्री. नारायण ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, तांत्रिक संकल्पना समजावून घेणे आणि मुलाखतींसाठी सक्षमपणे सिद्ध करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे हे प्रशिक्षण येणाऱ्या कॅम्पस ड्राइव्हमध्ये यश मिळवण्यासाठी एक मजबूत पायरी ठरेल.
सिंहगड महाविद्यालयात आयोजित या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे व्यावसायिक व तांत्रिक कौशल्य वृद्धिंगत होण्यास महत्त्वाचा हातभार लागला आहे. सोलापूर जिल्हयामध्ये अभियांत्रिकीच्या विदयार्थ्यांसाठी कॉग्नीझंट, नाईस सिस्टिम्स, एल.टी.आय माईंड ट्री इत्यादि कंपन्या कॅम्पस प्लेसमेंटसाठी फक्त सिंहगड महाविदयालयातील विदयार्थ्यांसाठीच सप्टेंबर महिन्यात उपलब्ध केलेल्या आहेत. यासाठी जावा प्रोग्रॅमिंग प्रशिक्षण विदयार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमध्ये निवड होण्यासाठी उपयुक्त ठरेल अशी आशा महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी केली.
हे प्रशिक्षण यशस्वी होणेसाठी महाविदयालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

