पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर सिंहगड महाविद्यालयामध्ये तरुणांमध्ये हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंचा प्रतिबंध करण्याचा प्रयत्न या विषयावर प्रसिद्ध फिजिशियन डॉ. नीरज दोडके यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान नुकतेच संपन्न झाले. या कार्यक्रमाचे आयोजन अँटी रॅगिंग सेल, इंटरनल कम्प्लेंट कमिटी आणि रोटरी क्लब पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख वक्ते डॉ. नीरज दोडके यांचा सत्कार प्राचार्य डॉ. करांडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रा. अंजली पिसे, प्रा. अंजली चांदणे, रोटरी क्लबच्या सदस्या सौ. ललीता कोळवले व कृतांजली सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या व्याख्यानात डॉ. नीरज दोडके यांनी सांगितले की, सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अयोग्य आहार, शारीरिक श्रमांचा अभाव, तणावपूर्ण जीवनशैली हे त्यामागील प्रमुख कारणे आहेत. मात्र योग्य आहार, नियमित व्यायाम आणि सकारात्मक जीवनशैलीमुळे या आजारावर नियंत्रण ठेवता येते.
डॉ. दोडके यांनी विद्यार्थ्यांना दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम करण्याचा सल्ला दिला. जॉगिंग, सायकलिंग, योग आणि प्राणायाम यांचा हृदयाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो, असे त्यांनी नमूद केले. आहारामध्ये फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये, कमी तेलकट पदार्थ आणि माशांमधील ओमेगा-३ फॅटी ॲसिडचा समावेश करावा, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. या आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रमाला महाविद्यालयातील ४०० हून अधिक विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरींग, द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी कु. वैष्णवी पवार व श्रावणी पवार यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंटरनल कम्प्लेंट कमिटी, सावित्रीबाई फुले गर्ल्स फोरमचे सर्व सदस्य, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.

