पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्र राज्याचे साखर संचालक (प्रशासन) व साखर आयुक्तालयाचे माजी आयुक्त डॉ.संजयकुमार भोसले यांनी गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) ला अलीकडेच सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी इंजिनिअरिंग मधील प्राध्यापकांना विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
स्वेरीचे संस्थापक व प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार यांनी त्यांचे स्वागत केले. साखर आयुक्तालयातील प्रशासन व अर्थविषयक कामकाजातील जाणकार अधिकारी म्हणून माजी साखर आयुक्त डॉ. संजयकुमार भोसले यांची ओळख आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण घेण्यासाठी बाहेर गावी जावे लागत होते हे पाहून डॉ बी. पी. रोंगे यांनी गोपाळपूरच्या माळरानावर २८ वर्षांपूर्वी इंजिनिअरिंगची स्थापना केली तेंव्हापासून विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तंत्रशिक्षणाबरोबरच फार्मसीचे डिप्लोमा डिग्री पीजी, तसेच एमबीए, एमसीए., पीएचडी अभ्यासक्रम आणि विधी (लॉ) कॉलेज सुरु असून त्यासाठी आवश्यक सर्व सुख सोयी आहेत. पाहुण्यांनी या सर्व बाबींविषयी माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर स्वेरीच्या संशोधन विभाग. मैदान, प्रयोगशाळा, आयडीया लॅब अशा विविध विभागांना भेटी देवून स्वेरीतील विविधता जाणून घेतल्या. यावेळी स्वेरीची यशस्वी वाटचाल, संशोधनातील प्रगती याबाबत संशोधन अधिष्ठाता डॉ. एम.एस. अभिषेक यांनी सविस्तर माहिती दिली.
माजी साखर आयुक्त भोसले म्हणाले की, ‘पायाभूत क्षेत्रांमध्ये नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध होत आहेत आणि त्यासाठी भविष्यात अभियंत्यांची खूप गरज आहे. इतर क्षेत्रांमध्ये देखील भारतामध्ये नवनवीन रोजगारांच्या संधी उपलब्ध होत आहेत पण त्यासाठी विद्यार्थ्यामध्ये प्रतिभा, ज्ञान, इंग्रजी संभाषण कौशल्य आणि तांत्रिक कौशल्य यांचा समावेश असावा. आपला विद्यार्थी कुठेही काम करताना त्याच्या कामातील गुणवत्ता कमी होऊ नये यासाठी विविध प्रेरणादायी उपक्रम राबविणे आवश्यक आहे. असे सांगून साखर कारखान्यांचे प्रशासन, धोरणात्मक निर्णय आणि अर्थविषयक बाबीं यावर त्यांनी विशेष प्रकाश टाकला.
यावेळी त्यांनी स्वेरीतील संस्कृती आणि शिस्तीचे कौतुक केले. यावेळी प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस चंद्रशेखर पाटील, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम.पवार, डॉ. एच.बी.रोंगे, संशोधन अधिष्ठाता डॉ. एम.एस. अभिषेक, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाचे प्रा. अविनाश मोटे यांच्यासह इतर प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

