पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
सिंहगड इन्स्टिट्यूट, पंढरपूर येथे महिंद्रा प्राईड क्लासरूम आणि नांदी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला विद्यार्थिनींसाठी रोजगारक्षमतेवर आधारित विशेष प्रशिक्षण कार्यक्रम ४ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०२५ दरम्यान यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या प्रशिक्षणामध्ये एम्पथी, आत्मविश्वास, संप्रेषण कौशल्य, साक्षात्कार, आणि सॉफ्ट स्किल्स यांसारख्या महत्त्वाच्या कौशल्यांवर भर देण्यात आला. प्रशिक्षणाचा उद्देश विद्यार्थिनींना कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हसाठी तयार करणे हा होता.
सत्रांचे मार्गदर्शन कुशल प्रशिक्षक आश्विनी टिळक व शिल्पा खुणे यांनी केले. त्यांनी विद्यार्थिनींना केवळ करिअर नव्हे तर एक जबाबदार नागरिक म्हणून घडवण्यासाठी आवश्यक असलेल्या जीवनकौशल्यांची माहिती दिली.
प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थिनींनी रोल प्ले, ग्रुप ॲक्टिव्हिटीज, मॉक इंटरव्ह्यू यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला. प्रशिक्षणानंतर अनेक विद्यार्थिनींनी आत्मविश्वास वाढल्याचे व प्लेसमेंटसाठी तयार असल्याचे नमूद केले.
महिंद्रा प्राईड क्लासरूम व नांदी फाउंडेशन यांचा हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी ठरला असून त्यांच्या भविष्यातील करिअरसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. या प्रशिक्षणासाठी तृतीय वर्षातील १०० हून अधिक विद्यार्थीनींनी सहभाग नोंदवला.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्लेसमेंट ऑफीसर डॉ. समीर कटेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

