मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
राज्यातील जवळपास २० जिल्ह्यांत, त्यातही विशेषत: मराठवाड्यातील जिल्ह्यांत पाऊस आणि महापुराने सर्वसामान्यांचे जगणे उद्ध्वस्त केले. शेती, पिके, घरेदारे, गुरेढोरे सगळे काही वाहून गेले. अत्यंत निगुतीने उभा केलेला संसार एका पावसाने मोडून पडला. पावसाने काही तासांत होत्याचे नव्हते झाले.
शाळकरी आणि महाविद्यालयीन पोरांची वह्या, पुस्तके, दफ्तरं सगळं वाहून गेलंय. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पूरग्रस्त विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी १२ वी चे अर्ज भरायला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी २९ सप्टेंबर रोजी संपत आहे. परंतु पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे मराठवाड्यातील हजारो १२ वी च्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज भरलेला नाही. अर्ज भरण्याचा उद्याचा एकच दिवस बाकी असल्याने एवढ्या जणांचे अर्ज भरणे शक्य नसल्याने मुदतवाढीची मागणी केली जात होती.
पूरग्रस्त भागातील हजारो विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारावीचे अर्ज भरण्याला मुदतवाढ दिल्याची घोषणा केली आहे. राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना त्यासंदर्भातील सूचना देण्यात येतील, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.