ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने 700 हून अधिक पेंटर बांधवांसोबत रक्षाबंधन साजरे; नशामुक्तीचे घेतले वचन
पुणे प्रतिनिधी सागर बोदगिरे तेज न्यूज
रक्षाबंधन म्हणजे केवळ राखी बांधण्याचा सण नाही, तर समाजात प्रत्येक स्त्रीमध्ये 'माझी बहीण' पाहण्याची जाणीव निर्माण करून तिचे रक्षण करण्याचा संकल्प घेण्याची ही वेळ आहे. समाजात अशी भावना रुजली तर महिला सुरक्षेसाठी कॅंडल मार्च काढण्याची वेळच येणार नाही, असे मार्गदर्शन ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या बोपोडी सेवा केंद्राच्या प्रमुख ब्रह्मकुमारी लक्ष्मी दिदी यांनी केले.
ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने तिरुपती गार्डन, विश्रांतवाडी येथे ७०० हून अधिक पेंटर कामगार बांधवांसोबत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले. यावेळी प्रत्येक बांधवाला राखी बांधून नशामुक्त जीवन जगण्याचा संकल्प घेण्यात आला.या विशेष कार्यक्रमात ब्रह्मकुमारी लक्ष्मी दिदी यांच्यासह बेन्झर पेंट्सचे संचालक प्रदीप अग्रवाल, उद्योजक अनिल अग्रवाल हे मान्यवर उपस्थित होते.
ब्रह्मकुमारी लक्ष्मी दिदी म्हणाल्या, “आजचा समाज मानसिक तणावाने ग्रासलेला आहे. अशा वेळी राजयोग ध्यानाच्या माध्यमातून मनःशांती, स्थैर्य आणि आत्मबल मिळवणे अत्यंत गरजेचे आहे. आमची संस्था कोणत्याही जात, धर्म, वय किंवा सामाजिक स्तर न पाहता सर्वांसाठी कार्यरत आहे.”
अनिल अग्रवाल यांनी सांगितले, “व्यवसाय हे केवळ नफा मिळवण्याचे साधन नसून, सामाजिक उत्तरदायित्व जपण्याचे एक प्रभावी माध्यमही आहे. रक्षाबंधनासारखे पारंपरिक सण अध्यात्माशी जोडून साजरे करून कामगारांशी आपुलकीचे नाते निर्माण करणे, व्यसनमुक्तीचा संदेश देणे हाच आमचा या उपक्रमाचा उद्देश आहे.”