पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे तेज न्यूज
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मराठी किंवा संस्कृत भाषेतून पूजा केल्या जातात. मात्र श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ३० ते ३५ मराठी कुटुंब एकत्रित असताना देखील मंदिर समितीच्या पुजाऱ्यांकडून हिंदीमध्ये पूजा केल्याचा दावा सोशल मीडियाच्या माध्यमातून नाशिक येथील एका भाविकाने केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याची दखल घघेतल्याने विठ्ठल मंदिरात हिंदी भाषेतून पूजा केल्याचे प्रकरण आता चांगलेच तापले आहे.
विठ्ठल भक्त राहुल सातपुते यांच्या तक्रारीची दखल घेऊन सदर मंदिर समितीच्या पुजाऱ्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबतची निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली मनसे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, शहराध्यक्ष संतोष कवडे यांच्या उपस्थितीत सोमवारी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला देण्यात आले.
मनसेच्या वतीने घेण्यात आलेल्या निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, तुकाराम भवान येथील श्री विठ्ठलाच्या तुळशी अर्चना पूजेवेळी राहुल सातपुते व त्याच्या कुटुंबातील किमान ३० ते ३५ नागरिक सहभागी होते.
एक कुटुंब वगळता इतर सर्व कुटुंब मराठी होते. परंतु त्या एका परप्रांतीय कुटुंबाने तुळशी अर्चना पूजा हिंदीतून सांगावी अशी मागणी संबंधित पुजाऱ्याकडे केली. त्यावेळी राहुल सातपुते यांनी आम्हाला हिंदी समजत नाही. माझ्या आई-वडिलांना हिंदी समजत नाही पूजेत सहभागी झालेले सर्व कुटुंब मराठी आहेत तरी आपण सर्व स्पष्टीकरण मराठीतून सांगा असे पुजाऱ्याकडे मागणी केली परंतु सदर पुजाऱ्याने त्यांची मागणी अमान्य करून पूजा हिंदीतून सांगितली आणि राहुल सातपुते व त्यांच्या कुटुंबीयांना अपमानित केले. सदर प्रकरण दुर्दैवी असून समितीच्या पुजाऱ्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी. तसेच पुढील सर्व पूजा मराठीतूनच कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत तात्काळ कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी मंदिर समितीची राहील असा इशारा मनसेच्या वतीने मंदिर समितीला मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिला आहे.