पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
प्रत्येक चतुर्थी दिवशीश्री क्षेत्र पखालपूर गणपतीच्या दर्शनासाठी बस सोडव्यात अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने पंढरपूर आगार प्रमुखाकडे केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
पंढरपूर शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र पखालपूर येथे प्राचीन जागृत असे गणपतीचे मंदिर आहे. नवसाला पावणारा गणपती अशी भाविकांची श्रद्धा आहे.त्याठिकाणी प्रत्येक महिन्यात चतुर्थी दिवशी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रत्येक "चतुर्थी" दिवशी दिवसभर तेथे जाण्या-येण्यासाठी एसटी ची सोय करण्यात येत असे. मात्र अलिकडे काही वर्षांपासून ती बससेवा बंद झालेली आहे. वास्तविक याठिकाणी जाण्या-येण्यासाठी सुरू केलेली बससेवा सुरूच ठेवणे आवश्यक होते. तथापि ती बंद आहे ही वस्तुस्थिती आहे.
मंगळवार दि. १२/८/२०२५ रोजी "अंगारकी चतुर्थी" आलेली आहे. या वर्षातील हा एकमेव योग आहे त्यामुळे तेथे जाण्या-येण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. सर्वसामान्य भाविक,जेष्ठ नागरिक,महिलांना रिक्षाने जाणे त्यांच्याआवाक्याबाहेर आहे.रिक्षाचालक
अवाजवी भाडे आकारणी करतात.त्यामुळे आपल्या प्रवाशांची,भाविकांची सोय म्हणून त्या दिवशी महामंडळाने पहाटेपासून रात्रीपर्यंत पंढरपूर-पखालपूर- पंढरपूर अशी बससेवा (फेऱ्या) सुरू ठेवावी
याचा गांभीर्याने व प्राधान्याने विचार करून अंगारकी चतुर्थी दिवशी बससेवा सुरू ठेवतील अशी अपेक्षा ग्राहक पंचायतीचे प्रांत सहसचिव दीपक इरकल,जिल्हा सचिव सुहास निकते, जिल्हा उपाध्यक्ष विनय उपाध्ये,तालुका संघटक महेश भोसले,उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे, जिल्हा सदस्य अण्णा ऐतवाडकर,पांडुरंग अल्लापूरकर, संतोष उपाध्ये,तालुका सदस्य सतिश निपाणकर यांनी व्यक्त केली आहे.

