पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक) मधील इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी व कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या विभागांच्या वतीने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई तर्फे आयोजिलेल्या ‘इमर्जिंग ट्रेंड्स इन एआय अँड डाटा सायन्स: हँड्स ऑन एक्सप्रेन्स वूईथ इंडस्ट्री ५.०’ या विषयावर एक आठवड्याचा फॅकल्टी डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम (एफडीटीपी) आजपासून सुरू झाला असून त्याचे आज उदघाटन करण्यात आले.
एमएसबीटीई अर्थात महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई तर्फे आयोजिलेला हा उपक्रम सोमवार, दि.११ ऑगस्ट पासून ते शनिवार, दि.१६ ऑगस्ट २०२५ पर्यंत चालणार आहे. या कार्यशाळेत महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमधील २७ प्राध्यापकांनी सहभाग घेतला आहे. यासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रोअझ्युर सॉफ्टवेअर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे प्रकल्प व्यवस्थापक (प्रोजेक्ट मॅनेजर) बापूजी अरकस हे लाभले होते. दीपप्रज्वलनानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे विभागप्रमुख प्रा.अमेय भातलवंडे व कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख प्रा. प्रशांत भंडारे यांनी स्वागत करून आठवडाभर चालणाऱ्या या प्रशिक्षणाचे स्वरूप स्पष्ट करून 'या प्रशिक्षणातून नवनवीन गोष्टी शिकून त्यांचा उपयोग विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी करावा' असे आवाहन केले. स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. करण पाटील यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महाविद्यालयात विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टी शिकवण्यासाठी कोणत्या पद्धतींचा अवलंब करता येईल याबाबत माहिती दिली. तर स्वेरी पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ यांनी ‘डेटा सायन्स’ म्हणजे मोठ्या प्रमाणातील डेटामधून उपयुक्त माहिती, नमुने आणि निर्णय घेण्यासाठी लागणारा आधार मिळवण्याचे विज्ञान आहे. यामुळे कार्यक्षमता वाढते, चुका कमी होतात आणि निर्णय क्षमतेचा वेग वाढतो.’ असे सांगून या प्रशिक्षण कार्यक्रमातून मिळणारे ज्ञान विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी कसे उपयुक्त ठरेल, याबाबतही त्यांनी विचार मांडले. प्रमुख अतिथी बापूजी अरकस यांनी ‘ए आय’ आणि ‘डाटा सायन्स’ हे सध्या सर्वच क्षेत्रात वापरले जाणारे आधुनिक तंत्रज्ञान असून कमी वेळेत अधिक काम पूर्ण करण्याची क्षमता, मानवी त्रुटी टाळून अचूक निकाल देण्याची क्षमता, श्रम व खर्चात बचत, तसेच आरोग्य, विज्ञान, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात संशोधनाला गती मिळवून देणारे हे तंत्रज्ञान आहे.’ असे सांगून ‘ए आय’ आणि ‘डाटा सायन्स’ याबाबत सविस्तर माहिती दिली. एकूणच या ‘ए आय’ आणि ‘डाटा सायन्स’ विषयावरील एक आठवड्याच्या फॅकल्टी डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम (एफडीटीपी) ला प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. यावेळी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख प्रा. पांडुरंग वलटे, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख प्रा. श्रीधर कुलकर्णी हे उपस्थित होते. प्रा. ऐश्वर्या सावंत यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रशिक्षणाच्या समन्वयिका प्रा. रेश्मा मलगोंडे यांनी मानले.