बारामती प्रतिनिधी तेज न्यूज
शारदानगर ता.बारामती येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालयातील राज्यशास्त्र व समाजशास्त्र युवा संवाद क्लबच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेमध्ये डॉ. परिमल माया सुधाकर आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक व डॉ. श्रुती तांबे समाजशास्त्र विभाग प्रमुख व स्त्री अभ्यासक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे उपस्थित होते.
डॉ. राजकुमार सुरवसे यांनी युवा संवाद क्लबचे प्रास्ताविक केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकुमार महामुनी यांनी मनोगत व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताचे स्थान व विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय राजकारण समजून घेण्याची मानसिकता यावर प्राचार्यानी मत व्यक्त केले.
डॉ. परिमल माया सुधाकर यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची भूमिका विशद करताना भारताचे स्थान गेल्या काही दशकामध्ये लक्षणीयरित्या बळकट झाले आहे. भारत हा एक उदयोन्मुख महासत्ता म्हणून ओळखला जातो. त्याच्या भौगोलिक, आर्थिक लष्करी व सांस्कृतिक ताकदीमुळे तो जागतिक राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही देश म्हणून ओळखला जातो. सुमारे १४० कोटी लोकसंख्येसह तो चीन नंतर दुसऱ्या क्रमांकाचा लोकसंख्येचा देश आहे. भारत ही जगातील पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे स्टार्टअप आयटी औद्योगिक आणि सेवा क्षेत्रातील विकासामुळे जागतिक गुंतवणूकदारांची नजर भारतावर आहे.
भारत जी-२० आणि ब्रिक्स सारख्या आंतरराष्ट्रीय गटामध्ये सक्रीय आहे. भारत हे अन्वस्त्रसज्ज राष्ट्र आहे त्याची तिसऱ्या क्रमांकाची मोठी लष्करी शक्ती आहे. मेक इन इंडिया अंतर्गत संरक्षण उत्पादन क्षेत्रात स्वयंपूर्णता साधण्याचे भारताचे प्रयत्न सुरू आहेत. भारत बहू-धुवीय जागतिक व्यवस्थेला समर्थन देतो त्यामुळे भारत गटनिरपेक्षता चळवळीचा पारंपारिक समर्थक देश म्हणून ओळखला जातो व तो अधिक व्यावहारिक आणि कूटनीतीचा वापर करतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले मित्र जोडण्याचा प्रयत्न करतो असे विचार डॉ परिमल माया सुधाकर यांनी विद्यार्थी व उपस्थित प्राध्यापकांना सांगितले.
डॉ. श्रुती तांबे यांनी २१ व्या शतकातील भारत स्वप्नचित्र की भयकथा या विषयावर विचार मांडताना लोकशाही मूल्ये व युवा पिढीची भूमिका शाश्वत विकास जागतिक नेतृत्वाच्या दिशेने वाटचाल करण्याची गरज आहे समाजाच्या गरजा ओळखून समाजाला शैक्षणिक, आर्थिक पातळीवर राज्य संस्थेने मदत करण्याचे गरज आहे असे मत सांगितले. राज्यसंस्थेचा लोककल्याणकारी विचार योग्य लोकापर्यंत पोहोचवण्याचे काम प्रशासनाने केले तर भारतासमोरील समस्या कमी होतील व समाज राज्यसंस्थेवर विश्वास ठेवेल असा विचार डॉ श्रुती तांबे यांनी विशद केला.
एकदिवसीय सेमिनारसाठी संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार, संस्थेच्या विश्वस्त सचिव सुनंदा पवार, संस्थेचे एच. आर. गार्गी दत्ता तसेच संस्थे सीईओ श्री. निलेश नलावडे यांनी या कार्यक्रमाकरिता मार्गदर्शन केले. सदर सेमिनारसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ. श्रीकुमार महामुनी, उपप्राचार्य मोहन निंबाळकर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्याचा परिचय प्रा. सुचिता कर्णेवार , सूत्रसंचालन डॉ. ए. आर. मुंगी यांनी व आभार प्रदर्शन डॉ. यू. बी. वाघमारे यांनी केले.