पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त श्री विठ्ठल सभामंडप येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीचे कीर्तन साजरे करण्यात आले. रात्री 11 वाजता श्री विठ्ठलास पोशाख करण्यात आला. त्यावेळी देवास मंदिल (जरीचे 110 हाताचे लाल पागोटे) चांदीची काठी, कुंची असा पोशाख करण्यात आला.
रात्री 12.00 वाजता पुजारी, उपस्थित मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर), ॲड माधवीताई निगडे, सल्लागार परिषद सदस्य ह.भ.प. प्रसाद महाराज अमळनेरकर, सचिन इथापे उपविभागीय अधिकारी पंढरपूर तथा कार्यकारी अधिकारी, प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत, विभाग प्रमुख संजय कोकीळ, सहाय्यक विभाग प्रमुख संदीप कुलकर्णी यांच्या हस्ते देवाच्या अंगावर गुलाल टाकण्यात आला.
श्री विठ्ठलास सुंठवडा, पेढे, बर्फी प्रसाद दाखवण्यात आला तसेच श्री विठ्ठल सभामंडप येथील पाळण्यामध्ये बाळकृष्ण व नारळ ठेवण्यात येऊन कीर्तनानंतर नारळ सुवासीणीला देऊन उपस्थित भाविकांना सुंठवडा प्रसाद वाटण्यात आला.
गोकुळाष्टीमीच्या उत्सवानिमित्त भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती. भजन, किर्तन अशा पारंपारिक पध्दतीने गोकुळाष्टमी मंदिरात रात्री उशिरापर्यंत साजरी करण्यात आली.