पनवेल प्रतिनिधी तेज न्यूज
१५ ऑगस्ट १९४७ भारतीय इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी कोरलेला तो दिवस, ज्या दिवशी भारताने गुलामगिरीची बेडी तोडून स्वातंत्र्याचे अमृतस्नान केले. आज, त्या ऐतिहासिक क्षणाच्या स्मृतींना साजेसा अभिमान बाळगत, आपण सर्वजण ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत. याच औचित्याने, आदर्श शैक्षणिक समूहाच्या मुख्य संकुलात स्वातंत्र्यदिनाचा भव्य सोहळा पार पडला.
भारतीय नौदलात यशस्वीपणे सेवा बजावणारे आणि १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग नोंदवलेले सेवानिवृत्त कमांडर जय लाल मान साहेब यांच्या शुभहस्ते, मोठ्या जोशात व देशभक्तीच्या वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजगीत, राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत आणि ध्वजप्रतिज्ञेच्या गुंजनाने संपूर्ण परिसरात एक अद्वितीय देशभक्तीची ऊर्जा संचारली.
यानंतर, आदर्श समूहाच्या देवद - विचुंबे येथील शैक्षणिक संकुलामध्ये भूदलातील सेवानिवृत्त ऑफिसर कॅप्टन मनोज भामरे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाला. दोन्हीही मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना देशभक्तीपर मार्गदर्शन करत, त्यांच्या मनामध्ये राष्ट्रसेवेची प्रेरणा व नवी दिशा निर्माण केली. या निमित्ताने आयोजित देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाने संपूर्ण सोहळा एका वेगळ्या उंचीवर नेला.
कार्यक्रमाच्या शेवटी, आदर्श समूहाचे चेअरमन तसेच भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र राज्य पदवीधर प्रकोष्ठाचे प्रदेश संयोजक धनराज विसपुते यांनी आपल्या प्रभावी मार्गदर्शनातून “माता आणि मातृभूमी” यांच्या अतुलनीय महत्त्वाची जाणीव करून दिली आणि आदर्श समूह सदैव देशभक्तीचे मूल्य विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजविण्यास तत्पर राहील, अशी ग्वाही दिली. या देशभक्तीच्या आणि अभिमानाच्या क्षणी, सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.