वाखरी, पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील नामांकित शैक्षणिक संस्था विश्वशांती गुरुकुल येथे ७९ वा स्वतंत्रता दिन अत्यंत उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शाळा व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी कर्नल मेजर हरी लक्ष्मण भोंगे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून दिलेल्या भाषणात संविधानातील मूल्यांवर प्रकाश टाकत युवकांनी राष्ट्रनिर्मितीत भूमिका बजावावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली, त्यानंतर राष्ट्रगीत व शिस्तबद्ध संचलन झाले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तिपर गीते, नृत्ये व नाटिका यांमधून भारताची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि लोकशाही मूल्यांचे दर्शन घडले.
प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांची ओळख शाळेचे प्राचार्य श्री. शिवाजी गावळी यांनी केले. यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. स्वप्नील शेठ, हेडमिस्ट्रेस श्रीमती शिबानी बॅनर्जी तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचा समारोप अरिफ सर यांच्या मनःपूर्वक आभार प्रदर्शनाने झाला. त्यांनी सर्व मान्यवर, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करत, त्यांच्या राष्ट्रीय कर्तव्यांची जाणीव निर्माण केली.