पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
मंगळवेढा तालुक्यातील मूढवी येथील कुविख्यात वाळू तस्कर आणि गुंड भैय्या उर्फ आकाश रोकडे, यास पंढरपूर तालुका पोलिसांनी गुरुवारी रात्रीच्या सुमारास अचानक स्थानबद्ध केले. त्याच्यावर गंभीर गुन्हे असल्याने जिल्हाधिकारी सोलापूर यांनी एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे. गुरुवारी पंढरपूर तालुका पोलिसांच्या पथकाने त्याला स्थानबद्ध केले , आणि त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली.
भैय्या उर्फ आकाश रोकडे( वय 26) हा पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात वाळू तस्करी करत होता. चोरी आणि दहशत पसरवणे अशा प्रकारचे गंभीर सहा गुन्हे त्याच्यावर होते. हा कुठल्याही प्रकारचा वैध व्यवसाय करत नव्हता. पंढरपूर तालुका हद्दीतील ओझेवाडी, पंढरपूर आणि मंगळवेढा शहर आणि आसपासच्या परिसरात भीमा नदी आणि मान नदीपत्रातून वाळू चोरी करून त्याची विक्री तो करत होता. यातून मिळणाऱ्या पैशाच्या जोरावर परिसरातील सर्वसामान्य जनतेत भेटीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याच्या कृत्यामुळे पंढरपूर तालुका व मंगळवेढा शहराच्या आसपासच्या परिसरातील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात दमदाटी करणे, भीतीचे वातावरण तयार करणे यामुळे सर्वसामान्य लोकांना त्याचे वागणे त्रासदायक झाले होते. पंढरपूर शहर आणि आसपासच्या परिसरात दहशतीचे कृत्य करून त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक असा वाळूतस्कर म्हणून स्वतःला सिद्ध केले होते त्याच्या विरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाणे, मंगळवेढा पोलीस ठाणे येथे येथे वाळू तस्करीचे पाच आणि सरकारी कामात अडथळा आणणे असे सहा गंभीर गुन्हे दाखल होते.
भैय्या रोकडे त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे त्याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी एमपीडीए कायद्यातील तरतुदीनुसार ,भैय्या रोकडे याच्याविरुद्ध स्थानबद्धतेचा आदेश केला आहे. आरोपीस ताब्यात घेऊन या कायद्याअंतर्गत कारवाई करून त्यास अखेर पंढरपूर तालुका पोलिसांनी ताब्यात घेऊन ,त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे.
सदरची कारवाई जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशान्वये पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागिय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक टी. वाय. मुजावर, पोसई भारत भोसले, विक्रम वडणे, दत्तात्रय तोंडले, सहा. फौजदार विजयकुमार गायकवाड, पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिस शेख स्थानिक गुन्हे शाखा पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेश रोकडे, दिपक भोसले, पोकॉ सागर गवळी, संजय गुटाळ,हासेन नदाफ, घाडगे ,विजयकुमार औटी,सायबर सेलचे पोलीस हवालदार रतन जाधव, वसंत कांबळे यांचे पथकाने केली आहे.