पंढरपूर प्रतिनिधी बिरूदेव केंगार तेज न्यूज
२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ६ः३० ते ३ ऑगस्ट मध्य रात्री २ः०० वाजे पर्यंत घेण्यात आलेल्या गोवा अल्ट्रा __द हेल रेस म्हणजेच नरक यातना देणारी १२० किलोमीटर ची स्पर्धा तब्बल २० तासांमध्ये पूर्ण करावयाचे आव्हान होते. सदर स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून फक्त ६९ धावक सहभागी झाले होते.सदर स्पर्धा गोवा येथील कॅनाकोना बीच ते नेत्रावली जंगल _नाकेरी_वर्का _वापोली__ डाबोलीम - बोग्मॅलो बीच येथे शेवट या मार्गावर आयोजीत करण्यात आली होती.
जवळपास १३०० मीटर उंची व १३०० उतराई करावयाची होती.नेत्रावली जंगलातील ३० किमी घनदाट डोंगरी मार्ग , ३५ किमी समुद्रकाठचा अति दमटमार्ग सुमारे ९५ते ९६% टक्के आर्द्रता, तापमान सरासरी ३० अंश सेल्सिअस अशा हवामाना मध्ये पार करणे मोठे आव्हान होते. दरम्यान ऊन , पाऊस , तीव्र दमटपणा यांचा सामना करत ज्या वातावरणामध्ये श्वास घेणे ही कठीण जाते अशा परिस्थितीमध्ये धावत इतके अंतर पार करणे म्हणजे शारीरिक आणि मानसिक क्षमतेच्या संयमाचा उच्चांक गाठणे. बदलत्या वातावरणा नुसार स्वतःवर नियंत्रण ठेवत , तग धरून धावत, म्हणजे शारीरिक मानसिक क्षमतेचा संपूर्ण कस लावत.
" ENRICH YOUR HEALTH, ENRICH NATION'S WEALTH" म्हणजेच
" तुम्ही आरोग्य समृद्ध व्हा व देश संपत्ती समृद्ध करा "हा संदेश देण्याचा मानस ठेवून सदर स्पर्धा ४३ व्या क्रमांकावर सुमारे १९ तास १५मिनिटात यशस्वीरित्या पूर्ण केली .
भारतातील मानव संपती ही पायाभूत, भौतीक, तंत्रज्ञान अथवा इतर कोणत्याही संपत्तीपेक्षा पेक्षा मोठी आहे. कारण भारताचा प्रत्येक क्षेत्रातील विकास करणारा हा भारतीय मानव म्हणजेच 'भारतीय नागरिकच' आहे.
काही तज्ञांच्या मते सुमारे ६५% भारतीय लोकसंख्या कोणत्या न कोणत्या , लहान मोठ्या प्रमाणात शारिरीक व मानसिक व्याधीने त्रस्त आहे. भारताची आजची लोकसंख्या सुमारे १५० कोटी च्या जवळपास आहे त्याच्या ६५% टक्के म्हणजेच सुमारे १०० कोटी लोकसंख्या कोणत्या न कोणत्या व्याधीने त्रस्त आहे. कमी प्रमाणात का असेना शारिरीक व मानसिक व्याधीने तस्त्र नागरिक आपल्या ठिकाणी तितका कर्तव्यक्षम व निर्मिती क्षम असू शकत नाही. याचाच अर्थ भारतीय नागरिकांचे आरोग्य प्राथमिकतेने भारतीय विकासाला बाधा ठरत आहे असे म्हणायला हरकत नाही.
तसेच "MY HEALTH _MY RESPONSIBILITY" म्हणजेच
" माझे आरोग्य माझी जबाबदारी " आहे असा प्रकर्षाने उल्लेख करत स्वतःचे आरोग्य स्वतः जपून आपण एक भारताचे उत्तम नागरिक बनू शकतो. आज कालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण स्वतःच्या आरोग्याकडे खूप दुर्लक्ष करतो त्यामुळे आपण फक्त स्वतः स्वतःचे भावनिक , मानसिक , आर्थिक नुकसान वा अपव्यय तर करतोच पण सोबत आपल्या कुटुंबाचेही पर्यायाने समाजाचे आणि भारताचेही नुकसान होत असते हे ही लक्षात घेणे गरजेचे आहे .तर आपण स्वतःचे आरोग्य जपून स्वतःला आजारापासून रोखून किंवा आजारी असलोत तरी त्याची तीव्रता कमी करून बरे होऊ शकतो. किमान भारताचे एक चांगले नागरिक बनू शकतो फक्त हा संदेश पोहोचावा ही एक प्रामाणिक इच्छा म्हणून हे १२० किलोमीटरचे आव्हान घेऊन गोवा अल्ट्रामॅरेथॉन मध्ये सहभाग घेतला. हा संदेश पोहोचवण्याचा मानस केला आणि तो यशस्वी रित्या पूर्णही केला.
दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला हवा, अन्न ,पाणी, यातून बरेच सूक्ष्मजीव जंतू शरीरामध्ये प्रवेश करून संक्रमण करत असतात.त्यातून आजारांची निर्मिती तर होतेच
कोरोना सारख्या परकीय विषाणू ने प्रत्येक भारतीय जागीच थांबविला हे आपण सर्वांनी अनुभवलेच आहे. या महामारीने किती हतबल करून भारताचे सर्वांगाने किती नुकसान केले याची आपण कल्पनाही करू शकत नाही. क्षणभर तो एक वैद्यकीय युद्धाचा प्रकार होता असे म्हणायला हरकत नाही.
जेव्हा पण कधी भौतिक युद्ध होते तेव्हा सीमेवर प्राण पणाला लावून सैनिक आपल्या देशातील नागरिकांची रक्षा करत असतात.कोरोना विषाणू ने भारतीय सीमेच्या आत येऊन जवळपास प्रत्येक भारतीयाच्या शरीरामध्ये आक्रमण केले.ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती जास्त होती ते त्यातून वाचले व ज्यांचे कमी होते ते आज आपल्यामध्ये नाहीत किमान एवढे तरी आज प्रत्येकास ठाऊक आहे.
तर आपले आरोग्य जपणे म्हणजे नेमकं काय करणेअसाही प्रश्न पडत असेल तर त्याचे उत्तर आहे की रोगप्रतिकार शक्ती वाढविणे याचाच अर्थ सदृढ जीवनशैली अंगीकारणे.आता सुदृढ जीवनशैली अंगीकारणे म्हणजे काय? तर त्याचे प्रामुख्याने तीन पैलू आहेत संतुलित आहार पुरेसा व्यायाम किंवा हालचाल आणि पुरेशी झोप याचे ज्ञान प्रत्येक भारतीयाला अवगत असणे ही काळाची गरज झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने संतुलित आहाराचा फार मोठा वाटा आहे .
ज्यामध्ये मानवी शरीराला आवश्यक असणाऱ्या कर्बोदके,प्रथिने, मेद,खनिजे ,जीवनसत्वे, पाणी यांचे प्रमाण निश्चित स्वरूपात माहीत असणे काळाची गरज निर्माण झाली आहे. त्याच बरोबर व्यायाम किंवा हालचाल म्हणजेच आपण सेवन केलेल्या अन्नाची उपयोगिता वाढविणे आणि शरीराचे झीज भरून काढण्यासाठी पुरेशी झोप या बाबी वर प्रकर्षाने विचार करणे हे देखील तितकीच महत्त्वाची बाब आहे.
जसे काहींना प्रश्न पडतो की युद्ध तर केव्हा तरीच होते पण जेव्हा युद्ध होत नाही तेव्हा भारतीय सैन्य काय करत असते तर केव्हा तरी का होईना पण होणाऱ्या युद्धाचे तयारी करत असते. दैनंदिन जीवनात तर आपल्याला हवा अन्न पाणी यातून सूक्ष्मजीवांच्या माध्यमातून संक्रमण होतच असते परंतु जेव्हा कोरोना सारखा विषाणू भारतीय सीमारेषेच्या आत येऊन भारतीयांच्या शरीरामध्ये प्रवेश केला, तेव्हा आपल्याला वाचवण्यासाठी ती भारतीय सैन्याची जबाबदारी तर नक्कीच नव्हती. किमान आपण आज एवढं तरी समजू शकतो की ती आपली स्वतःची जबाबदारी होती आणि आज ती आपण घ्यायला हवी. दैनंदिन जीवनात होणारे संक्रमणे असतील किंवा कोरोना महामारी सारखे येणारे संकट असो आपण सदृढ जीवनशैली अंगीकारून कोणत्याही संक्रमणास अगदी योध्याप्रमाणे आतून लढण्यासाठी स्वतःला सक्षम करणे काळाची गरज बनली आहे."सुदृढ जीवनशैली" हा काही मर्यादित स्वरूपाचा काळ नसून तो एक सुंदर प्रवास आहे तसेच सकारात्मक, समाधानी व आनंदी जीवनाचा मार्ग देखील आहे. प्रत्येक भारतीयाने जर ही जबाबदारी स्वीकारली तर भारत विकसित राष्ट्र व्हायला वेळ लागणार नाही.
या स्पर्धेमध्ये एक वर्ष सहा महिने धावण्याच्या सरावानंतर सहभाग नोंदविला. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. सोलापूर तथा प्रभारी जिल्हाधिकारी सोलापूर कुलदीप जंगम ,अपर जिल्हाधिकारी - मोनिका सिंग ठाकूर ,गट विकास अधिकारी , पंचायत समिती पंढरपूर , सुशील संसारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच टीम रन फन पंढरपूर ,पंढरपूर रनर्स असोसिएशन,माळशिरस फिटनेस क्लब,करकंब रनर्स क्लब,ग्रामपंचायत अधिकारी संघटना डीएनए 136 सोलापूर यांचे कडून प्रेरणा व सहकार्य मिळाले.
नाव अस्लम हुसेन मुलाणी, वय वर्ष ४२ ,मूळ गाव पुरंदावडे ता माळशिररस जि सोलापूर येथील रहिवासी असून सध्या अजोती येथे ग्रामपंचायत अधिकारी या पदावर पंचायत समिती पंढरपुर येथे कार्यरत आहेत.
तर प्रत्येक भारतीय नागरिकाचे आरोग्य जितके निरोगी सदृढ राहील, तितकाच तो कर्तव्यक्षम, निर्मितीक्षम राहील व भारताच्या विकासाला हातभार लागेल.असा संदेश अस्लम हुसेन मुलाणी यांनी सर्व भारतीयांना दिला आहे.