पंढरपूर प्रतिनीधी तेज न्यूज
संत नामदेव मंदिराचा जीर्णोद्धार , संत नामदेव महाराज यांचे वैश्विक दर्जाचे स्मारक व संताच्या अभंगातील विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम शासन करेल असे अभिवचन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले .
फडणवीस म्हणाले, भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करणारे संत नामदेव हे पहिले संत आहेत . तलवारीच्या जोरावर भागवत धर्म संपवायला निघालेल्या मोघलांच्या राज्यात विठ्ठल भक्ती व भागवत धर्म जागविण्याचे काम संत नामदेव महाराज यांनी केले. भारतातील २२ राज्यात भागवत धर्माचा प्रचार व प्रसार केला . ते पहिले फडकरी होते . भारतीय संस्कृतीच्या एकात्मतेचे पाईक होते . त्यांनी भाषेचे बंध तोडले व सर्व जाती धर्मातील संताना बरोबर घेवून सर्व समाजाला जोडण्याचे काम त्यांनी केले . ते पहिले चरित्रकार , समाज सुधारक होते . त्यांच्या अभंगात संवाद , नाट्य मिळते . त्यांनी बाल कविताही लिहिल्या . मराठी गझलांचे मूळ संत नामदेव आहेत . भाषा ही मैत्री आणि बंधुत्वाचा धागा आहे . समाजाला शिवण्याची कला संत नामदेव महाराज यांच्या कडे होती असे ते म्हणाले.
श्री संत नामदेव क्षत्रिय एकसंघच्या वतीने आयोजित केलेल्या संत शिरोमणी श्री नामदेव महाराज परिवार व संत जनाबाई महाराज यांच्या ६७५ व्या षटशतकोत्तर अमृत महोत्सवी संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले , संत नामदेव महाराज यांचे भव्य स्मारक उभे रहावे यासाठी ६५ एकरावरील जागा द्यावी व स्मारक उभे करावे . संत नामदेव महाराज यांच्या मंदिराचा विकास करावा .
यावेळी संत नामदेव महाराज यांचे वंशज केशव महाराज, माधव महाराज, कृष्णदास महाराज , मुकुंद महाराज , ज्ञानेश्वर महाराज यांचे संतपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, आ समाधान अवताडे, आ रणजितसिंह मोहिते पाटील, आ अभिजीत पाटील,माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी खा रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आ राजेंद्र राऊत, सिने अभिनेते गोविंद नामदेव , श्री संत नामदेव क्षत्रिय एकसंघचे राष्ट्रीय अध्यक्ष महेश ढवळे , राष्ट्रीय सचिव रुपेश खांडके, प्रदेशाध्यक्ष गणेश उंडाळे,जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, संत नामदेव महाराज रथ व सायकल यात्रेचे आयोजक सूर्यकांत भिसे, जगदीश परिहार ( गुजरात ) , नानासाहेब पाथरकर ( दिल्ली ) , के एल नामदेव ( छत्तीसगड ), खेमराज नामा , डॉ हरिराम रोहिला ( राजस्थान) , उमेश गेहलोत ( चेन्नई ) , खेमचंद टेलर दरोगाजी ( हरियाणा ) , अरुण नामदेव ( मध्यप्रदेश ) , सुखवीनदरसिंग ( पंजाब ) , ॲड . सागर मांढरे , सुधीर बोरकर, प्रकाश परारिया , मनोज भांडारकर, तेज न्यूज संपादक प्रशांत माळवदे यांच्या सह देशभरातून हजारो नामदेव समाज व नामदेव भक्त उपस्थित होते .
प्रास्ताविकात राष्ट्रीय अध्यक्ष महेश ढवळे म्हणाले , यंदाचे वर्ष हे संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचा ६७५ वा संजीवन समाधी सोहळा, संत ज्ञानेश्वर महाराज यांचा सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी सोहळा , जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचा ३७५ वा वैकुंठ गमन सोहळा
तर संत सावता माळी महाराज यांचा ७३० वा समाधी सोहळ्याचे वर्ष आहे . संत नामदेव महाराजांनी शांती , समता आणि बंधुता या तत्वाचा वापर करुन महाराष्ट्रासह देशात भागवत धर्माचा प्रचार व प्रसार केला. १२ ते १६ व्या शतकापर्यंत देशात मोगलांचे राज्य असतानाही व हिंदू धर्म अडचणीत असतानाही सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन भजन , कीर्तनाच्या माध्यमातून श्री विठ्ठल भक्ती जगवली , वारकरी संप्रदाय वाढविला . जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागणाऱ्या व आम्हाला अहंकारापासून दूर ठेव म्हणणाऱ्या या संतांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून श्री क्षेत्र पंढरपूर येथे देशभरातील विठ्ठल भक्तांचा मेळा आम्ही आयोजित केला आहे . जगाला शांती , समता व बंधुताचा संदेश देणारे संत नामदेव महाराज यांचे श्री क्षेत्र पंढरपूर येथे भव्य स्मारक उभे करावे अशी मागणी त्यांनी केली.
संत नामदेव महाराज यांचे वंशज ज्ञानेश्वर महाराज नामदास यांनी आशीर्वादपर संदेश दिला. ६७५ वर्षापूर्वी देव पांडुरंग समाधी सोहळ्यास उपस्थित होते. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहिले आहेत हे वारकरी संप्रदायाचे भाग्य आहे.