पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
केंद्र शासनाच्या गृहमंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजाकरिता प्लॅस्टिकच्या वापरास व निर्मितीस मनाई आहे. भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापर व निर्मिती करण्यात येऊ नये असे आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.
राष्ट्रध्वजाविषयीचे प्रेम, निष्ठा, अभिमान दर्शविण्याकरिता विद्यार्थी नागरिकांकडूनदेखील राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. कार्यक्रमानंतर राष्ट्रध्वज विविध सार्वजनिक ठिकाणी टाकले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. रस्त्यात इतरत्र विखुरलेले राष्ट्रध्वज बरेच दिवस नष्ट होत नाहीत. राष्ट्रप्रतिष्ठेच्या दृष्टीने ही बाब गंभीर आहे.. राष्ट्रध्वजाचा अवमान करणे त्याची विटंबना होणे हे बोधचिन्हे नावे (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम १९५० राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम १९७१ तसेच ध्वजसंहितेच्या तरतुदीनुसार दंडनीय अपराध आहे.
खराब झालेले, राष्ट्रध्वज आढळून आल्यास ते सन्मानपूर्वक गोळा करुन नजीकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयामध्ये जमा करावेत. तसेच नागरिकांनी ध्वज संहितेच काटेकोर पालन करावे असे आवाहनही प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.