मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
अमेरिकेतील श्रुसबरी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मागील बारा वर्षापासून येथील हिंदू लोक एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने आनंदाने गणेशोत्सव साजरा करीत आहेत.
बाप्पांचा उत्सव साजरा करण्याचे त्यांचे यंदाचे १३ वे वर्ष आहे.जवळपास एक तप होऊन गेले.एखादा गुण आग्रहपूर्वक बारा वर्षे आपणात उतरविण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे तप! बारा वर्षे त्याच गुणाचा पाठपुरावा केलेला असेल, तर मग तो 'स्वभाव' बनून जातो.१३ वर्षांपूर्वी एका कल्पनेच्या स्वरूपात काही जणांनी रुजवलेले हे श्रुसबरी च्या गणेशोत्सवाचे बीज, आज एक मोठे वृक्ष बनले आहे. लहानपणी भारतात आपण जगलेला गणेशोत्सव इथे आपल्या मुलांना कळवा ह्या उद्देशातून ह्याची खरंतर सुरुवात झाली .. मोजक्या काही कुटुंबांसाठी मर्यादित न ठेवता सार्वजनिक व्हावा म्हणून ISW (India Society of Worcester) च्या आपल्या ह्या दुसऱ्या घराने आपल्याला सहज सामावून घेतले.ह्याच वास्तूत तो सुरु झाला आणि फुलत राहिला .. ह्या कार्यातून, अनेक माणसे, अनेक कुटुंब, अनेक मन जोडली गेली (अजून जोडली जात आहेत). त्या नात्यांचा, त्या परिवारांचा आणि या कार्यक्रमाच्या स्वरूपाचा सुद्धा .. परीघ दिवसोंदिवस वाढत गेला. सुरुवातीला ३०-४० लोकांची संख्या आता २००-२५० पर्यंत गेली आहे तरी कार्यक्रमाचे स्वरूप अगदी घरगुती राहिले आहे.
अनेक कलागुण, अनेक पुरोगामी विचार, अनेक "नॉस्टॅल्जिक" परंपरा, सांस्कृतिक ठेवी, काही नवीन प्रकल्प, नवा पायंडा आणि अनेकानेक (umpteen) सुंदर गोड आठवणींनी नटलेला हा गेल्या १३ वर्षांचा आपला प्रवास. नवनवीन "themes" विषय घेऊन आपली सांस्कृतिक आणि कलात्मक जिज्ञासा अनेक जण जोपासू शकले, स्वेच्छेने सेवा करू शकले. दर वर्षी त्या थिम ला जोडून शोभिवंत आरास आणि त्याच थीम ला जोडून नाटक, नृत्य, संगीत ह्याचे सहजसुंदर प्रदर्शन ... सारे होतकरू कलाकार समरूप होत गेले. जुन्या कार्यक्रमांची छायाचित्र आणि चलचित्र हा आपला मौल्यवान ठेवा बनत गेली, जगलेल्या गोड आठवणींची पुंजी बनून. पूजा, आरती, प्रसाद आणि पंगत वजा भोजन असा भरगच्च कार्यक्रम दर वर्षी उत्साहात होत राहिला. उत्सवाच्या आधी बाप्पाची मूर्ती हाताने बनवण्याची कार्यशाळा, मिरवणुकीत ढोल-ताशा पथक अशया अनेक जोड उपक्रमांची सुद्धा त्याच्या अनुशंगानी सुरुवात झाली आणि ते हि उत्तरोत्तर फुलत गेले.
कुणा एका व्यक्तीचे हे यश नाही -- आपले हे कुटुंब असेच मोठे आणि सुधृढ होवो, आपली नवीन पिढी ह्यामुळे एकमेकांशी जोडलेली राहो आणि त्यांनाही ह्यातून तितकाच किंबहुना जास्ती आनंद मिळावा ही बाप्पांकडे प्रार्थना नक्कीच करेन. सर्व कार्यकर्ते, लहान मोठे, सर्वांचे मनापासून आभार ! गणपती बाप्पा मोरया !