पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधन समिती व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘९ ऑगस्ट क्रांती दिन’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बाळासाहेब बळवंत होते. या प्रसंगी मंचावर कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. भगवान नाईक नवरे, शास्त्र विभागाचे उपप्राचार्य डॉ. राजेश कवडे, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. समाधान माने आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राध्यापक प्रबोधन समितीचे चेअरमन डॉ. उमेश साळुंखे यांनी केले. सुरुवातीला कर्मवीर भाऊराव पाटील व रयतमाऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
विशेष व्याख्यानात प्रा. डॉ. गोवर्धन दिकोंडा यांनी सांगितले की, "९ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावरील काँग्रेस बैठकीत महात्मा गांधींनी ‘करो या मरो’चा नारा दिला, आणि यानंतर ‘भारत छोडो’ आंदोलनाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या आंदोलनात पुरुष, महिला व मुलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. ब्रिटिश साम्राज्याविरुद्धची ही लढाई भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील निर्णायक टप्पा ठरली. त्यांनी महात्मा गांधींच्या सविनय कायदेभंग, असहकार यांसारख्या निशस्त्र आंदोलनांचा व दुसऱ्या महायुद्धातील भारताच्या भूमिकेचा उल्लेख केला."
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. बळवंत यांनी 'भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील विविध ऐतिहासिक घटनांचा आढावा घेत क्रांती दिनाचे विशेष महत्त्व अधोरेखित केले.'
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. भारती सुडके यांनी केले तर आभार प्रा. मयूर चव्हाण यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक-प्राध्यापिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.