सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
उमा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, सोलापूर. क्रमांक १,२,३,५,६,७,८,१२ब, १२क , १३अ व १३ ब या जुनी मिल कंपाऊंड व उमा नगरी, मुरारजी पेठ येथील ११ गृहनिर्माण संस्था डॉ. प्रगती बागल, उपनिबंधक, सहकारी संस्था शहर सोलापूर यांनी दि.२२/०८/२०२५ च्या आदेशानुसार अवसायनात काढून संस्थेचा कारभार पाहण्यासाठी अवसायक म्हणून श्री राजेश देशपांडे यांची नियुक्ती केली आहे. या संस्थांनी माहिती न देणे ,ऑडिट रिपोर्ट न देणे, निवडणुका न घेणे. तसेच नोंदणी व व्यवस्थापन शर्तीचे उल्लंघन केल्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ व १०३ अन्वये या संस्था अंतरीम अवसायनात काढून त्यावर प्रशासकाची नियुक्ती केलेली आहे व पुढे त्यांचे म्हणणे सादर करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे.
सदर उमा सहकारी गृहनिर्माण संस्था कुमार शंकर करजगी याने बोगस कागदपत्राद्वारे व नगर भूमापन अधिकाऱ्यांशी संगनमत करून १९८८ साली नोंद केलेली होती व त्यापुढे सदर उमा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या २२ पोट संस्था बनवण्यात आलेल्या होत्या. जुनी मील ट्रस्टच्या १३७ एकर जागेवर या संस्थांचे बोगस पद्धतीने नाव लावण्यात आलेले होते.
सोलापुरातील जुनी मील बेकार कामगार ,वारसदार आणि जनहित संघर्ष समिती, सोलापूर या ट्रस्टची १३७ एकर जागा १९८९ साली मुंबई उच्च न्यायालयातून ट्रस्टच्या अकराशे सदस्यांनी कोट्यावधी रुपये भरून ट्रस्टच्या नावे घेतलेली होती. कुमार करजगी ,स्वर्गीय शरद मुथा , सुरेंद्र कर्णिक व त्यांच्या हस्तकांनी या जुनी मील जागेच्या भूखंडाचा घोटाळा करून या जागा बोगस उमा सहकारी संस्थेच्या नावे बोगस कागदपत्राद्वारे विकल्या व गहाण दिलेल्या होत्या. याबाबतीत या तिघांवर २०१७ ला फौजदारी गुन्हे दाखल होऊन सध्या सोलापूर जिल्हा न्यायालयामध्ये दावा सुरू आहे.
या सोसायट्यांच्या सर्व जागेचे व्यवहार हे अनधिकृत ठरले आहेत. तेथील ले आउट रद्द करण्यात आलेले आहेत, नगर भूमापन कार्यालयाने येथील मोजणी बंद केलेले आहे. सोलापूर महानगरपालिकेने येथील बांधकाम परवाने बंद करून आतापर्यंतच्या कोणत्याही बांधकामास वापर परवाना दिलेला नाही. जुनी मील ट्रस्टची १३७ एकर जागेची नोंदणी ही धर्मादाय आयुक्तांकडे २०१९ मध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे या जागेचे खरेदी विक्री, गहाण असे कोणतेही व्यवहार करू नयेत असे संस्थेचे सचिव डॉ. संदीप आडके यांनी सर्व नागरिकांना कळवलेले आहे.
एकाच दिवशी अकरा बोगस गृहनिर्माण संस्थांवर अशी कारवाई झाल्यामुळे सोलापुरातील भूमाफियांचे धाबे दणाणले आहे.