सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
वि. गु, शिवदारे प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्य सेनानी माजी आमदार कै. वि. गु शिवदारे यांच्या जयंतीनिमित्त जीवनगौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम रविवार, दि. १७ ऑगस्ट रोजी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या वा. का. किर्लोस्कर सभागृहात झाला. विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या मान्यवरांना गौरविण्यात आले.
डॉ. बसवराज कोलूर (वैद्यकीय क्षेत्र), शुभांगी बुवा (सामाजिक क्षेत्र), सोमनाथ हुलगे (कृषी क्षेत्र), प्रशांत जोशी (पत्रकारिता क्षेत्र) या मान्यवरांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. २१ हजार एक रुपये रोख, स्मृतिचिन्ह असे पुरस्कारांचे स्वरूप होते. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला.
याप्रसंगी राजा माने यांनी "सहकारापुढील आव्हाने आणि संधी" या विषयावर प्रबोधनात्मक विचार व्यक्त केले. ते म्हणाले, सहकार चळवळ कशी असते हे महाराष्ट्राने देशाला दाखवून दिले. मात्र, मागील काही वर्षांत ही चळवळ बदनाम झाली. आता पुन्हा देशभरात सहकार क्षेत्रात बदल होत आहेत. काळ बदलला, मनोवृत्ती बदलली, प्रश्न बदलले या प्रश्नाला उत्तर द्यायचे काम आपण करायला हवे.
यावेळी मंचावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, नरेंद्र गंभिरे आदी उपस्थित होते. प्रा. शुभदा उपासे यांनी सूत्रसंचालन केले. आभार प्रदर्शन बाहुबली दोशी यांनी केले.

